मतदान केल्याचा पुरावा म्हणून हाताच्या बोटावर लावण्यात येणारी शाई आता अधिक मोठय़ा आणि ठसठशीत स्वरूपात लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदारांच्या बोटाला योग्य प्रकारे शाई लावण्यात येत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता नव्या ब्रशने अधिक मोठय़ा आणि ठसठशीत स्वरूपात शाई लावण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जारी केले आहेत.
आता मतदानासाठी नव्या स्वरूपाच्या ब्रशने डाव्या हाताच्या तर्जनीच्या नखाच्या टोकापासून ते तर्जनीच्या निम्म्या भागापर्यंत शाई लावण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या बोटावर शाई योग्य प्रकारे लावण्यात आली आहे का, याची खातरजमा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे नियंत्रण हाती असलेल्या निवडणूक अधिकाऱ्याने करावयाची आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
अलीकडेच झालेल्या काही निवडणुकांच्या वेळी निवडणूक आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे नव्या आदेशाची प्रत सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.म्हैसूर पेण्टस अॅण्ड वॉर्निश लि. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना, ब्रश आणि शाईचा पुरवठा राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना त्वरित करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2015 रोजी प्रकाशित
मतदारांच्या बोटावर अधिक मोठी, ठसठशीत शाई
मतदान केल्याचा पुरावा म्हणून हाताच्या बोटावर लावण्यात येणारी शाई आता अधिक मोठय़ा आणि ठसठशीत स्वरूपात लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

First published on: 04-06-2015 at 03:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission of india ink on finger