लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजयकी घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक वेगवेगळ्या पक्षांमध्ये सामील होत आहेत. काही दिवसांपूर्वी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. तर कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता हवाई दलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी भदौरिया यांनी भारतीय हवाई दलात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. तसेच आता राजकारणाच्या माध्यमातून सुरक्षा दलाला आणखी बळकट करण्यासाठी ते भूमिका वठवतील, असे सांगितले. भदौरिया यांनी जवळपास ४० वर्ष लष्कराची सेवा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर कार्यक्रमातही त्यांनी योगदान दिलेले आहे. आरकेएस भदौरिया यांच्याबरोबरच आज वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते वरप्रसाद राव वेलागापल्ली यांनीही भाजपात प्रवेश केला.

धक्कादायक: सद्गुरु यांच्या इशा फाऊंडेशनमधून ६ लोक बेपत्ता; पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती

आरकेएस भदौरिया यावेळी म्हणाले की, राष्ट्रनिर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला भाजपात येण्याची परवानगी दिली, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी हवाई दलाला ४० वर्ष सेवा देऊ शकलो, हे मी माझे भाग्यच समजतो. मागच्या ८ ते १० वर्षात लष्कराला बळकट करण्यासाठी आणि आत्मनिर्भरता आणण्यासाठी या सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या. ज्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळाले आहेत.

‘नरेंद्र मोदींना २८ पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवं’, उदयनिधी स्टॅलिन यांची टीका

सूत्रांच्या माहितीनुसार, भदौरिया उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. सध्या लष्कराचे माजी (निवृत्त) अधिकारी व्ही. के. सिंह याठिकाणचे खासदार आहेत. व्ही. के. सिंह यांचे तिकीट यावेळी कापले जाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर लष्करातलाच एक माजी अधिकारी या जागेवर उभा केला जाऊ शकतो.

भाजपाने आतापर्यंत लोकसभा उमेदवारांच्या चार याद्या प्रसिद्ध केल्या असून त्याद्वारे २९१ उमेदवारांची घोषणा केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरकेएस भदौरिया कोण आहेत?

राकेश सिंह भदौरिया हे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. हवाई दलाचे प्रमुख होण्यापूर्वी त्यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणूनही कार्यभार सांभाळला होता. भदौरिया यांनी पुण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा अकादमीमधून आपले शिक्षण घेतले. त्यांनी आतापर्यंत एकूण ४२५० तासांचे उड्डाण घेतले आहे. तर २६ विविध प्रकारच्या लढाऊ विमानांना चालविण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. हवाई दलात त्यांनी विविध पदे आजवर भूषविली आहेत.