पत्रात शिवसेना पक्षप्रमुखांची भेट मागितल्याचा दावा

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार ओम राजेिनबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली आहे. एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे चार एकर जमिनीचे ओम राजे आणि विजय दंडनाईक यांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे हाल झाले आहेत. त्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. सविस्तर पुरावे घरी कपाटातील पिशवीत पाहायला मिळतील, असे चिठ्ठीत नमूद करून उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आणखी एका पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते मुंबई येथे गेले होते, असा उल्लेख केला आहे. मात्र, त्यांची मुंबईत भेट होऊ शकली नाही, ती झाली असती तर प्रकरण एवढे पुढे गेले नसते, अशी प्रतिक्रिया आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या सहकाऱ्याने दिली.

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील दिलीप ढवळे (वय ५९) यांनी शुक्रवारी पहाटे शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशातून ढोकी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आणि मतदारांना आवाहन करणारे एक पत्र मिळून आले आहे. ढोकी पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीत शिवसेनेचे उमेदवार ओम राजेिनबाळकर आणि वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांनी केलेल्या फसवणुकीमुळेच आपल्यावर ही वेळ आली. या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले. आपल्या नावे घेतलेल्या कर्जाची सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देऊनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीन वेळा लिलाव पुकारला गेला. त्यातून गावात मानहानी झाली आहे. सततचा दुष्काळ आणि यांनी केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. या चिठ्ठीव्यतिरिक्त मतदारांना केलेले दोन पानी आवाहनपत्रदेखील त्यांच्या खिशात आढळून आले आहे. यात तेरणा कारखाना सुरू करण्यासाठी ७२ शेतकऱ्यांच्या नावे प्रत्येकी तीन लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आले. या कर्जाची परतफेड करण्याची हमी कारखान्याच्या संचालक मंडळाने शपथपत्राद्वारे बँकेकडे दिली. मात्र कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे ७२ लोकांच्या जमीन आणि वाहनांच्या लिलावाची कारवाई करण्यात आली. काही जणांच्या जमिनी लिलाव करून विक्रीदेखील करण्यात आल्या आहेत.

आपण सर्व मध्यमवर्गीय शेतकरी आहोत. हे कर्ज फेडणे आपल्याला शक्य नसल्यामुळे ७२ पकी २० जणांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबई गाठली. मातोश्री बंगल्याच्या गेटजवळ दोन दिवस रणरणत्या उन्हात रस्त्याच्या कडेला थांबलो. मात्र ओम राजे यांनी त्यांचा प्रभाव वापरून उद्धव ठाकरे यांची भेट होऊ दिली नाही, असेही ढवळे यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ओम राजेनिंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले, त्यांचेच संसार ओम राजे यांनी फसवणूक करून उद्ध्वस्त केले आहेत. आज मुद्दल आणि व्याजासह प्रत्येकाच्या डोक्यावर दहा ते बारा लाखांचे कर्ज आहे. त्यामुळे संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांनी काय करावे, असा सवालही ढवळे यांनी या पत्रातून उपस्थित केला आहे.

ठाकरे भेटले असते तर जीव वाचला असता

दिलीप ढवळे यांच्याप्रमाणेच फसवणुकीला बळी पडलेले श्रीमंत तांबारेदेखील मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र भेट न होऊ शकल्याची ते खंत व्यक्त करतात. उद्धव ठाकरे यांची भेट झाली असती तर काहीतरी मार्ग नक्की निघाला असता. आत्महत्या करण्याची वेळ ढवळे यांच्यावर आली नसती. आज दिलीप ढवळे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. उद्या आमच्यावर ती वेळ येणार आहे. जमीन विकून कर्जाची परतफेड करावी लागेल, अन्यथा आत्महत्या करण्याखेरीज दुसरा पर्याय आपल्यासमोर शिल्लक नसल्याचे श्रीमंत तांबारे यांनी सांगितले.

कारखान्याच्यावतीने ऊसतोडणी ठेकेदारास प्रत्येकी तीन लाख रुपयांचे कर्जवाटप वसंतदादा बँकेमार्फत केले होते. त्यास तेरणा सहकारी साखर कारखाना हमी होता. ज्या ठेकेदाराने ऊसतोडणीचे काम केले त्यांची रक्कम संबंधित बँकेला परतदेखील केली. मात्र, ही रक्कम ज्या व्यक्तींच्या नावासाठी परत केली होती, त्या व्यक्तीच्या नावे न करता सर्व रक्कम समान पद्धतीने विभागली गेली. त्यात आमचा काही दोष नाही. उलट शेतकऱ्यांच्यावतीने आम्हीच बँकेच्या विरोधात सुरू असणाऱ्या न्यायिक प्रक्रियेत आम्हाला प्रतिवादी करून घ्यावे, अशी विनंती केली होती. घडलेली घटना दुर्दैवी आहे. मात्र, त्यात कारखान्याचा किंवा माझा दोष नाही तर बँकेचा दोष आहे.

-ओम राजेनिंबाळकर, शिवसेना उमेदवार