Pakistani Spy Ring In India: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या काहींना अटक करण्यात आले आहे. यामध्ये पंजाबमधील युट्यूबर्सचा मोठा प्रमाणात समावेश आहे. अशात अटक करण्यात आलेल्या एका युट्यूबरने म्हटले आहे की, माजी पाकिस्तानी पोलीस अधिकारी गुप्तहेर रॅकेटचा मास्टरमाइंड होता.
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पंजाबचा युट्यूबर जसबीर सिंगने चौकशीदरम्यान खुलासा केला की, माजी पोलीस अधिकारी नासिर ढिल्लनने त्याची लाहोरमधील इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली होती. त्यानेच पाकिस्तानमध्ये आयएसआय ऑपरेटिव्ह दानिशसोबत जसबीर सिंगची भेटही आयोजित केली होती.
नासिर ढिल्लन, जो आता एक युट्यूबर आहे, तो भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना आयएसआय ऑपरेटिव्ह दानिश उर्फ एहसान-उर-रहमानशी ओळख करून असे, जो दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात व्हिसा अधिकारी म्हणून काम करत होता. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्या, ऑपरेशन सिंदूर आणि ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्राला हेरगिरी प्रकरणात अटक झाल्यानंतर दानिशला भारतातून हाकलून लावण्यात आले होते.
जसबीर सिंग आणि नासिर ढिल्लन दोघेही ज्योती मल्होत्राला ओळखतात. ज्योती मल्होत्रा आयएसआयकडून चालवल्या जाणाऱ्या कथित हेरगिरी गटातील अटक झालेल्या पहिल्या हेरांपैकी एक होती.
पाकिस्तान उच्चायुक्तालयातून चालायचे हेरगिरी रॅकेट
शिवाय, पोलिसांना असे आढळून आले आहे की, दानिश हेरांना दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात पाहुणे म्हणून बोलावत असे आणि कामे सोपवत असे. सुरक्षा यंत्रणांना असाही संशय आहे की पाकिस्तान पोलिसांचे शेकडो माजी कर्मचारी हेरगिरी रॅकेटचा भाग आहेत, जे भारतीय युट्यूबर्सना लक्ष्य करतात.
‘जानमहाल व्हिडिओ’ नावाचे युट्यूब चॅनल चालवणाऱ्या जसबीर सिंग याला बुधवारी भारतीय सैन्याच्या हालचालींची माहिती आयएसआयला दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. युट्यूबवर दहा लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स असलेला जसबीर सिंग शाकीर उर्फ जट्ट रंधावा या आयएसआय अधिकाऱ्याच्या संपर्कात होता, असे पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले.
जसबीर सिंगचा तीन वेळा पाकिस्तान दौरा
जसबीर सिंग तीनदा पाकिस्तानला गेला होता आणि त्याच्या उपकरणांवर अनेक पाकिस्तानी नंबर सापडले आहेत. दानिशच्या निमंत्रणावरून तो दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमातही सहभागी झाला होता.