scorecardresearch

उत्तर प्रदेशात काँग्रेसला धक्का ; गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय आरपीएन सिंह भाजपमध्ये

आरपीएन सिंह यांच्या ‘अनपेक्षित’ भाजपप्रवेशाची नामुष्की ओढवलेल्या काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न नेतृत्वाकडून सुरू असतानाच मंगळवारी पक्षाला मोठा धक्का बसला़  गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय आणि ओबीसी नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला़

दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी धर्मेद्र प्रधान आदी नेत्यांची आरपीएन सिंह यांनी बुधवारी भेट घेतली आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, आरपीएन सिंह यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा पत्राद्वारे पक्षाध्यक्ष सोनिया गांधींकडे पाठवला. काँग्रेसने उत्तर प्रदेशसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत सिंह यांचा समावेश करण्यात आला होता़  त्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी काँग्रेसचा हात सोडून कमळ हातात घेतले. ज्योतिरादित्य शिंदे, अनुराग ठाकूर, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी आरपीएन सिंह यांचे भाजपमध्ये स्वागत केले. ‘‘गेली ३२ वर्षे मी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केल़े, पण आता तो पूर्वीचा राजकीय पक्ष राहिलेला नाही. प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना मीदेखील नवा राजकीय प्रवास सुरू करत आहे,’’ असे सिंह पत्रकार परिषदेत म्हणाले. 

आरपीएन सिंह यांच्या ‘अनपेक्षित’ भाजपप्रवेशाची नामुष्की ओढवलेल्या काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली. ‘‘भाजपविरोधातील दीर्घकालीन लढाई लढण्यासाठी धैर्य व कणखर मनाची गरज असते, भ्याड ही लढाई लढू शकत नाहीत,’’ अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केली.

आरपीएन सिंह २००९ मध्ये कुशीनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार बनले होते. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दुसऱ्या पाच वर्षांच्या कालखंडात सिंह हे मनमोहन सरकारमध्ये मंत्रीही होते. त्यानंतर मात्र गेल्या दहा वर्षांत अनेक काँग्रेस नेत्यांप्रमाणे त्यांनाही सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यांना झारखंडचे प्रभारीपद देण्यात आले होते. झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसचे आघाडी सरकार स्थापन करण्यात सिंह यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. ज्योतिरादित्य यांच्याप्रमाणे सिंह हेही काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य होत़े  मात्र, राहुल गांधी यांच्या मोदींवरील टीकेला त्यांनी विरोध केला होता. उत्तर प्रदेशच्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या सभांमध्ये सिंह हजर असत. मात्र, प्रदेश काँग्रेसची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवलेली नव्हती. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या निर्णयप्रक्रियेत सिंह यांचा समावेश नव्हता. प्रियंका गांधी यांच्या चमूतही नसल्याने सिंह नाराज असल्याची चर्चा होती़.

स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात लढत?

राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जाणारे आरपीएन सिंह हे कुर्मी समाजातील असून, त्यांचा प्रभाव उत्तर प्रदेशात पूर्वाचलमधील कुशीनगर जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. पडरौना विधानसभा मतदारसंघातून सिंह तीन वेळा (१९९६ ते २००९) आमदार बनले होते. मात्र, गेल्या तीन निवडणुकांमध्ये पडरौनामधून स्वामी प्रसाद मौर्य जिंकून येत आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी मौर्य यांनी योगी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. आता ते समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पडरौना मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. मौर्य यांच्यासारख्या प्रबळ ओबीसी नेत्याविरोधात आरपीएन सिंह यांना भाजपच्या वतीने उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते.

२०१४ पासून काँग्रेसमधून गळती अशी..

ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, हिमंत बिस्वा शर्मा, सुष्मिता देव, ललितेशपती त्रिपाठी, खुशबू सुंदर, प्रियंका चतुर्वेदी,टॉम वडक्कन, चौधरी बिरेंद्र सिंह, रिटा बहुगुणा जोशी, ऊर्मिला मातोंडकर.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gandhi family loyalist rpn singh joins bjp zws

ताज्या बातम्या