सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची कानउघडणी केल्यानंतर गिरीराज सिंह यांना अश्रू अनावर झाले. मात्र, गिरीराज सिंग यांनी असा कोणताही प्रकार घडल्याचा पूर्णपणे इन्कार केला. माझी आणि पंतप्रधानांची भेट झालीच नाही आणि मी रडलो असे तुम्हाला कोणी सांगितले, तिथे कोणी बघायला होते का, असा सवालही त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला. परंतु, गिरीराज सिंह जेव्हा मोदी यांच्या कार्यालयातून बाहेर आले तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते, असे काही प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.
नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच पक्षाच्या सर्व खासदारांना विरोधकांविषयी वादग्रस्त विधान करून अकारण कोणताही वाद न ओढवून न घेण्याची तंबीही दिली होती.
सोनिया गांधी यांच्याविरुद्धच
सोनिया गांधी नायजेरियन वंशाच्या असत्या आणि त्यांचा वर्ण गोरा नसता, तर काँग्रेसने त्यांना स्विकारले असते का, असे वादग्रस्त विधान सिंग यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर विरोधकांकडून सिंह आणि संपूर्ण भाजप पक्षावर टीकेचा मारा झाला होता. त्यानंतर सिंग यांनी याबद्दल तत्काळ माफी मागून माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसल्याचे स्पष्ट केले होते. गिरीराज सिंह यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये नायजेरिया या देशाचा उल्लेख केल्यामुळे त्या देशानेसुद्धा भारत सरकारकडे माफी मागण्याची मागणी केली होती.



