जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी नवनीत राणा यांना मोठा दिलासा!

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द ठरवत धक्का दिला होता

MP Navneet Rana
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा

अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत कौर यांना आज (मंगळवार) सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. याव्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने ८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत ​​सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जून रोजी होईल.

मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला नवनीत कौर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने नवनीत कौर यांचे जात प्रमाणपत्र बनावट घोषित केले होते. यासह हायकोर्टाने आपल्या निर्णयात नवनीत कौर यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला होता. हायकोर्टाच्या आदेशामुळे नवनीत कौर यांचे सदस्यत्व धोक्यात आले होते.

हेही वाचा- दाक्षिणात्य अभिनेत्री ते खासदार; जाणून घ्या नवनीत राणा यांच्याविषयी खास गोष्टी

बनावट जात प्रमाणपत्राद्वारे निवडणूक लढविल्याचा आरोप

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अ‍ॅड. सी. एम. कोरडे, अ‍ॅड. प्रमोद पाटील व अ‍ॅड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली होती.

शिवसेनेवर केली होती टीका

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर प्रतिक्रीया देतांना नवनित राणा यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या. ”या प्रकरणात कोणी राजकारण केलं हे मला सांगण्याची गरज नाही. पण माझी आणि शिवसेनेची लढाई सर्वांना माहिती आहे. गेले ८ ते ९ वर्ष मी हा लढा लढत आहे. अचानक न्यायालयाचा निर्णय येणं म्हणजे यामध्ये पॉलिटिकल खिचडी शिजली आहे”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Great relief to navneet rana in case of cancellation of caste certificate srk