भडकलेल्या इंधनदरामुळे महागाईचा चढता आलेख रोखण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क लिटरमागे आठ रुपयांनी, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क सहा रुपयांनी कमी करण्यात आले. त्यामुळे इंधन स्वस्त झाले आहे. इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला. त्यामुळे पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सोमवारी इंधनाच्या दरात कपातीबाबत एक वक्तव्य करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याचे श्रेय दिले आहे.

पंतप्रधानांना सर्वसामान्यांची काळजी असते. सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. किमतीत वाढ होऊनही पेट्रोल आणि डिझेलचा वापर मागील वर्षांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. काही लोक निर्णयाकडे राजकीय दृष्टीने पाहतात. पण हे चुकीचे आहे, असे पुरी म्हणाले.

आज तकच्या वृत्तानुसार, इंधनाच्या वाढत्या किमतींवर केंद्रीय मंत्री म्हणाले की, माझ्या हातात असते तर तुमच्या-माझ्यासह प्रत्येकाच्या घरामागे तेलाची विहीर खणली असती. त्यांनी दिल्लीच्या केजरीवाल सरकारची खिल्ली उडवली आणि म्हणाले की काही राज्यांनी इंधनाऐवजी दारूवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिगर भाजपाशासित राज्येही सर्वसामान्यांना दिलासा देतील, अशी अपेक्षा आहे.

पुरी यांनी दिल्लीतील व्हॅट कपातीबाबतही भाष्ये केले आणि अरविंद केजरीवाल यांच्याशी बोललो असल्याचे सांगितले. “त्यांना सांगितले की जर तुम्ही इंधनाचे दर कमी केले नाहीत तर तुमचे नुकसान होईल आणि तेच झालं. जेव्हा दिल्लीतील मागणी १५ टक्के कमी झाली तेव्हा त्यांना किंमती कमी करण्यास भाग पडले. त्यांनी आधी कपात केली नाही, कारण दिल्ली सरकारला जाहिरातींवर पैसे खर्च करण्याची गरज होती,” असे पुरी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय मंत्री पुरी यांनीही इंधन दरांवर सरकारच्या नियंत्रणाबाबतची परिस्थिती स्पष्ट केली. “तेल विपणन कंपन्या सरकारी कंपन्या नसून जबाबदार कॉर्पोरेटवाले लोक आहेत. दरवाढ झाली आहे का हे विचारण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक मला रोज सकाळी फोन करत नाहीत. ते स्वत: दर ठरवण्याच्या स्थितीत आहेत. मला मार्ग मिळाला तर तुमच्या-माझ्यासह प्रत्येक घरामागे तेलाची विहीर असेल,” असे पुरी म्हणाले.