“…तर पुन्हा एकदा अफगाणी जनतेसमोर राष्ट्राध्यक्षाला फासावर लटकवलं असतं”; घनी यांनी व्यक्त केली भीती

देश सोडून पळून गेल्यानंतर पहिल्यांदाच समोर आले अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी. आपला निर्णय योग्य असल्याचं सांगतानाच काही दाव्यांसंदर्भात दिलं स्पष्टीकरण.

ashraf ghani
घनी यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती.

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळून गेल्यानंतर पहिल्यांदाच समोर आले आहेत. देश सोडल्याचं समर्थन करतांनाच तालिबान्यांना घाबरून देश सोडला नसून, एक जबाबदार लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणून देश सोडल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. सध्या आपण संयुक्त अरब अमिरातीमध्ये आश्रय घेतला आहे, असंही घनी यांनी सांगितलं आहे. या शिवाय आपण अफगाणिस्तानमध्ये परतण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचं घनी यांनी म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सध्याच्या परिस्थितीत देश सोडण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. जर आपण देश सोडला नसता, तर प्राणाला मुकावं लागलं असतं अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली.

नक्की वाचा >> अफगाणिस्तान सोडताना चार गाड्या भरुन पैसा नेला?; अशरफ घनी यांनी दिलं सविस्तर स्पष्टीकरण

चार गाड्या भरुन पैसे सोबत घेऊन गेल्याचे आरोप खोडून काढताना घनी यांनी कशा परिस्थितीत आपण देशातून पलायन केलं याबद्दल भाष्य केलं. “मी एवढ्या तातडीने देश सोडला की मला माझ्या स्लिपर्स आणि बूट सोबत घेण्यासही वेळ मिळाला नाही. एक पारंपारिक कपड्यांचा जोड, एक कोट आणि घातलेल्या सॅण्डल एवढ्या तीन गोष्टी सोबत घेऊन मी देश सोडला,” असा दावा घनी यांनी केलाय. फेसबुकवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये घनी यांनी आपण देशामध्येच थांबलो असतो तर आपली हत्या झाली असती अशी भीती व्यक्त केलीय. “मी तिथेच थांबलो असतो तर अफगाणी जतनेच्या डोळ्यांसमोरच त्यांनी निवडून दिलेल्या राष्ट्राध्यक्षाला पुन्हा फासावर लटकवलं असतं,” असं घनी यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. मोहम्मद नजीबुल्लाह या अफगाणी राष्ट्राध्यक्षाला तालिबानने २७ सप्टेंबर १९९६ रोजी गोळ्या घालून ठार केलं होतं. त्यानंतर त्यांचा मृतदेह काबूलमधील राजवाड्यासमोरच्या सिग्नलवर लटकवण्यात आलेला.

नक्की वाचा >> “तालिबान अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाही कारण त्यांना माहितीय, मोदीजी…”

तालिबानने रविवारी सायंकाळी देशाची राजधानी काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर घनी यांनी देश सोडल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र आता आपण पुन्हा मायदेशी परतण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे घनी म्हणाले आहेत. तसेच देशात सध्या सुरु असणाऱ्या राजकीय चर्चांना आपला पाठिंबा असल्याचंही घनी यांनी म्हटलं आहे. “सध्या देशामध्ये सरकारने सुरु केलेल्या वाटाघाटीच्या चर्चांना माझा पाठिंबा आहे. आता अब्दुल्ला अब्दुल्ला आणि माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा यशस्वी होणं गरजेचं आहे,” असं घनी म्हणालेत.

नक्की वाचा >> “भूतकाळात केलेली ती चूक मी पुन्हा घडू देणार नाही, अफगाणिस्तान लष्करच…”; बायडेन यांचा निर्धार

काबूल हे राजधानीचे शहर तालिबानने काबीज केल्यानंतर आपण रक्तपात टाळण्यासाठी रविवारीच देश सोडला असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. शहरातील साठ लाख लोकांसाठी ही मोठी मानवी शोकांतिका आहे, कारण त्यांना आता त्यांचे भवितव्य माहिती नाही, असंही घनी यांनी म्हटलं होतं.

घनी यांनी अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना देश सोडण्याचं कारण सांगितलं होतं. “सशस्त्र तालिबानला राजप्रासादात घुसून हिंसाचार करू द्यायचा, की प्रिय देश सोडून जायचे असे दोन पर्याय होते. जर मी तेथेच राहिलो असतो तर तालिबानने हिंसाचार करीत आणखी लोकांना ठार केले असते. काबूल शहराचा विध्वंस झाला असता व साठ लाख लोकांना त्यामुळे आणखी धोका निर्माण झाला असता. तालिबानने मला देश सोडण्यास भाग पाडले. ते काबूलवर हल्लय़ासाठी आले होते, तेथील लोकांवर त्यांना हल्ले करायचे होते त्यातून मोठा रक्तपात झाला असता, त्यामुळे आपण देश सोडून जाणे पसंत केले. तालिबान्यांनी तलवारी व बंदुकांच्या जोरावर देश ताब्यात घेतला. आता देशातील लोकांचा सन्मान, संपत्ती व आत्मप्रतिष्ठा यांचे रक्षण करण्याचे काम त्यांचेच आहे,” असं घनी म्हणाले होते.

नक्की वाचा >> घनी लवकरच अफगाणिस्तानमध्ये परतणार?; देश सोडून पळून गेल्यानंतर पहिल्यांदाच आले समोर

कोण आहेत अशरफ घनी?

घनी हे अर्थशास्त्रज्ञ असून ते अफगाणिस्तानचे १४ वे अध्यक्ष होते. ते २० सप्टेंबर २०१४ रोजी पहिल्यांदा निवडून आले व नंतर २८ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची फेरनिवड झाली. गेल्या वर्षी मार्चमध्ये गुंतागुंतीच्या निवडणूक प्रक्रियेत त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. आधी ते काबूल विद्यापीठाचे कुलपती होते, नंतर काही काळ देशाचे अर्थमंत्रीही होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: If i had stayed back an elected afghanistan president would have been hanged again ashraf ghani scsg

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य