IMD Rain News Updates: हवामान खात्याने जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार, यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. मंगळवारी हवामान विभागाने सांगितले की, भारतात सरासरीपेक्षा १०६ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा अंदाज एप्रिलमध्ये केलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे. भारतात दीर्घ कालावधीचा सरासरी पाऊस ८६८.६ मिमी आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की २०२५ च्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
हवामान विभागाने प्रसिद्धी पत्रकाट म्हटले आहे की, जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान देशाच्या ईशान्य आणि वायव्य भाग वगळता, भारतातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. जूनमध्येच, देशात सरासरी १६.७ सेमीपेक्षा कमीत कमी ८% जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान आयएमडी जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैमधील पावसाचा अंदाज जाहीर करणार आहे.
गेल्या पाच वर्षांत, २०२२ आणि २०२४ असे दोनदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी झाले आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, २०२२ आणि २०२४ मध्ये मान्सूनची सुरुवात अनुक्रमे २९ मे आणि ३० मे रोजी झाली होती.
नैऋत्य मान्सूनची सामान्य सुरुवात १ जूनला होते. पण, नैऋत्य मान्सून एक आठवड्यापूर्वी २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील २-३ दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात मान्सून पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे, नैऋत्य मान्सून ईशान्य राज्यांच्या उर्वरित भागांमध्ये व पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये पुढे जाण्यासाठी हवामानविषयक परिस्थिती अनुकूल आहे.
ओडिशा आणि मध्य भारतातील काही भागात पुढील चार दिवस अधिक पाऊस पडण्याची शक्यता असली तरी, अधिकाऱ्यांच्या मते, मान्सून दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाताना मंदावण्याची शक्यता आहे. दिल्लीत मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख जूनचा शेवटचा आठवडा आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने, शेतकऱ्यांनी पेरणी सुरू करण्यापूर्वी काही दिवस वाट पाहावी असा इशारा दिला आला आहे. याचबरोबर कोअर झोन समजल्या जाणाऱ्या मध्य भारत, ओडिशा आणि राजस्थानच्या काही भागात शेती जवळजवळ पूर्णपणे पावसावर अवलंबून असते, या भागात यंदा सरासरीपेक्षा ६% जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.