जैशच्या तळावरील मशिदीला धक्का न लावता केला एअरस्ट्राइक

एअरफोर्स आणि गुप्तचर संस्थेने शत्रूचे नेमके किती नुकसान झाले त्याबद्दल विश्लेषण करणारा एक अहवाल तयार केला आहे.

पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावरील एअरस्ट्राइकनंतर एअरफोर्स आणि गुप्तचर संस्थेने शत्रूचे नेमके किती नुकसान झाले त्याबद्दल विश्लेषण करणारा एक अहवाल तयार केला आहे. एअरफोर्सच्या फायटर विमानांनी ठरवलेल्या लक्ष्यांचा अचूक वेध घेतल्याचे या अहवालात म्हटले आहे.

जैशच्या बालकोटमधील तळावर मध्यभागी एक मशीद होती. एअर स्ट्राइकमध्ये या मशिदीचे काहीही नुकसान झालेले नाही. भारताने मशिदीला कुठलाही धक्का न लावता हा हल्ला केला. त्यावरुन एअरस्ट्राइकच्या अचूकतेची कल्पना येते.  हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. या कारवाईत नेमके किती दहशतवादी ठार झाले त्याबद्दल अहवालात कुठलीही ठोस माहिती दिलेली नाही. जैशच्या तळावर एक गेस्ट हाऊस होते. जैशचा म्होरक्या मसूद अझहर त्याचा भाऊ अब्दुल रौफ अझहर आणि जैशचे कमांडर इथे थांबायचे.

या तळावर प्रशिक्षणासाठी येणाऱ्या दहशतवाद्यांसाठी एक वसतिगृह होते. या वसतिगृहाच्या बाजूला फायरिंग रेंज होती. जिथे दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जायचे. ही सर्व टार्गेट हल्ल्यामध्ये उद्धवस्त करण्यात आली. एअरफोर्स आणि गुप्तचर संस्थेने उपग्रह आणि रडारने घेतलेले फोटोही आपल्या अहवालात जोडले आहेत.

नेमकी जिवीतहानी किती झाली त्याबद्दल मात्र ठोस कुठलीही माहिती अहवालात देण्यात आलेली नाही. हा एअरस्ट्राइक कितपत परिणामकारक ठरला त्यावरुन माध्यमांमध्ये बरीच उलट-सुलट चर्चा सुरु आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाल्यानंतर बारा दिवसांनी भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानांनी बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हल्ला केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: In balakot airstrike mosque in complex was untouched

ताज्या बातम्या