देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती जशा वाढत जातील तशी रुपयाच्या मुल्यामध्ये घसरण होत जाईल. सहाजिकच या सर्वाचा परिणाम पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती वाढण्यामध्ये होणार आहे.
सध्या देशात पेट्रोल-डिझेलचे दर मागच्या १६ वर्षातील उच्चांकी पातळीवर आहेत.

म्हणून वाढतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती
पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये विविध करांचा समावेश झाल्यामुळे आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतात. पेट्रोलच्या किंमतीमध्ये करांचा वाटा ५० टक्के तर डिझेलच्या किंमतीमध्ये ४० टक्के करांचा वाटा असतो. पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कर, वॅट आणि डिलर्सचे कमिशन आकारले जाते. वॅटचा कर प्रत्येत राज्यानुसार बदलत जातो त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळया असतात.

भारतात पेट्रोल-डिझेल महाग असले तरी घरगुती वापराचा एलपीजी गॅस शेजारी देशांच्या तुलनेत स्वस्त आहे. भारताच्या शेजारी देशांमध्ये पेट्रोल-डिझेलवर भारताइतका कर आकारला जात नसल्यामुळे तिथे पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे.

डिझेलच्या किंमतीने देशात सार्वकालीन उच्चांक गाठला आहे. सोमवारी पेट्रोलच्या किंमतीत ३३ ते ३४ पैशांनी तर डिझेलच्या किंमती २५ ते २७ पैशांची वाढ करण्यात आली. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ७६.५७ रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेलच्या किंमतीनी उच्चांक गाठला असून प्रतिलिटर ६७.८२ रुपयांवर पोहोचलं आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे. रविवारी ८४.०७ रुपये प्रतिलिटर मिळणारं पेट्रोल आज सकाळी 6 वाजेपासून ८४.४० रुपये झालं आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोल ७६.०६ रुपयाने मिळत होते.