पाटणा : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयावर फार चर्चा करण्याची गरज नाही, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी व्यक्त केले. इंडिया आघाडीने आपली भविष्यातील रणनीती निश्चित करण्यासाठी वेगाने कामाला लागले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

इंडिया आघाडीच्या पुढील बैठकीवर आपण लक्ष केंद्रित करत असल्याचे नितीशकुमार म्हणाले. ही बैठक आता या महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात होणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, ही बैठक बुधवारी नवी दिल्लीत होणार होती. मात्र, अनेक घटक पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे ती दोन आठवडयांनी पुढे ढकलण्यात आली. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीविषयी रणनीती ठरवण्यासाठी नवी दिल्लीत १७ डिसेंबरला आघाडीची बैठक होणार आहे, असे मंगळवारी सांगितले होते.

हेही वाचा >>> भारत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार? पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मोहिमेचं वर्षही जाहीर केलं

पाटण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार म्हणाले की, ‘‘काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. निवडणुकीच्या राजकारणात या गोष्टी होत राहतात. आधी या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते. आता भाजप जिंकली आहे. यावर फार चर्चा करण्याची गरज नाही.’’

तृणमूलची जलद जागावाटपाची मागणी

कोलकाता : लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जलद जागावाटप करावे, अशी सूचना तृणमूल काँग्रेसने केल्याचे समजते. जागावाटपाबरोबरच भाजपसमोर विश्वसनीय आव्हान उभे करण्यासाठी एकत्रित भूमिका स्थापित करण्यासाठी आणि अंतिम जाहीरनामा निश्चित करण्यासाठीही तृणमूल काँग्रेस आग्रही आहे. तीन यशस्वी बैठकांनंतर निर्माण झालेला उत्साह, काँग्रेस विधानसभा निवडणुकांमध्ये व्यग्र झाल्यानंतर आलेल्या निष्क्रियतेमुळे मावळला असल्याचे मतही या पक्षाकडून व्यक्त केले गेले.

Story img Loader