इंडोनेशिया व इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर भारतातील बोईंग विमानांचा वापर बंद होणार का, याबाबत निर्माण झालेले संभ्रम अखेर दूर झाले आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने ‘बोईंग’ विमानासंदर्भात हवाई वाहतूक कंपन्यांना सुरक्षा सूचना जारी केली असून यात वैमानिकाला उड्डाणाचा किमान एक हजार तासांचा अनुभव तर सह वैमानिकाला उड्डाणाचा किमान 500 तासांचा अनुभव बंधनकारक करण्यात आला आहे.

इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला रविवारी भीषण अपघात झाला. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता. रविवारी झालेल्या अपघातात १५७ जण ठार झाले आहेत. इथिओपियन एअरलाइन्सचे विमान नैरोबीकडे जाण्यासाठी उडाले असताना सहा मिनिटात ते कोसळले होते त्यात सर्व प्रवासी ठार झाले. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर भारतातील बोईंग विमानांचा वापर बंद होणार का, याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. बोईंग ७३७ मॅक्स विमानांचा वापर भारतातही केला जातो. जेट एअरवेज व स्पाइस जेट या कंपन्या ७३७ मॅक्स बोईंग विमानांचा वापर करतात.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बोईंग ७३७ मॅक्स विमानांचा वापर भारतातही केला जात असून त्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर हवाई वाहतूक महासंचालनालयाने बोईंग विमानासंदर्भात सुरक्षा सूचना जारी केली आहे. यात वैमानिकांचा उड्डाणाचा अनुभव ही महत्त्वाची अट ठरणार आहे.

दरम्यान, इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला अपघात झाल्यानंतर चीननेही बोईंग ७३७ मॅक्स ८ विमाने व्यावसायिक सेवेतून काढून घेतली आहेत. इंडोनेशिया व इथिओपिया या दोन्ही अपघातात साम्य असल्याचे चीनच्या हवाई वाहतूक प्रशासनाने म्हटले आहे. चीनमधील देशांतर्गत विमान कंपनीने सायंकाळपासून बोईंग ७३७ मॅक्स ८ विमाने सेवेतून वगळली आहेत. उड्डाण सुरक्षा अभ्यासानंतरच या विमानांची उड्डाणे परत सुरू होतील. चीनमधील हवाई वाहतूक प्रशासन या विमानाच्या सुरक्षेबाबत अमेरिकी हवाई प्रशासन व बोईंग कंपनी यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे चीनच्या हवाई वाहतूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.