Indian workers faces tension in Israel : कामानिमित्त दरवर्षी हजारो भारतीय इस्रायलला जातात. हमासबरोबरच्या संघर्षानंतर इस्रायलमध्ये मजुरांचा तुटवडा निर्माण झाला होता. इस्रायलमधील नोकरीची संधी ओळखून २०२३ नंतर हजारो भारतीयांनी इस्रायल गाठलं होतं. चांगले पैसे कमावण्याच्या उद्देशाने भारतीय लोक इस्रायलला जाऊन तिथे मिळतील ती कामं करत आहेत. मात्र, इस्रायलचा एकाच वेळी आजूबाजूच्या अनेक देशांशी संघर्ष चालू असल्याने इस्रायलमध्ये तणावाची स्थिती आहे. हमास, इराण व हेझबोलाचे इस्रायलमधील हल्ले व सशस्त्र कारवायांमुळे तिथे राहणाऱ्या भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
इस्रायलचा हमासबरोबर (पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना) संघर्ष चालू असतानाच आता व इस्रायल व इराणमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यासह सीरीया व लेबनॉनबरोबरही इस्रायलचं वैर आहे. या तणावाच्या स्थितीमुळे इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसमोरील आव्हानं वाढली आहेत. हमासबरोबरच्या युद्धामुळे तिथले भारतीय आधीच चिंतेत होते. आता त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यांना २४ तास सतर्क राहावं लागत आहे.
तणावाच्या स्थितीत इस्रायलमधील मजुरांची तारेवरची कसरत
इस्रायलमध्ये हजारो भारतीय गवंडीकाम, लोहारकाम, सुतारकाम, टायलिंग (फरशी बसवणे) व बेकरीमधील कामे करतात. इस्रायलमधील तणावाची त्यांनाही झळ बसत आहे. अधून मधून मिसाइल अलर्ट (क्षेपणास्त्र हल्ल्याची सूचना), बॉम्ब हल्ल्याची सूचना मिळते आणि या सर्वांना हातातली कामं सोडून शेल्टरच्या (सुरक्षित आश्रय) दिशेने धाव घ्यावी लागते. तर, कधी-कधी मॉकड्रिल केलं जातं. हे मजूर रात्री गाढ झोपेत असताना अचानक सायरन वाजतात. सायरनचा आवाज ऐकताच या सर्वांना शेल्टरच्या दिशेने धाव घ्यावी लागते. इस्रायलमध्ये या शेल्टर्सना मिकलात असं म्हटलं जातं.
हिमाचल प्रदेशमधील मोहनलालने सांगितली आपबिती
मूळचा हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोहनलाल हा इस्रायलमधील तेल अवीव शहरापासून २८ किलोमीटर दूर पामाखीम येथील एका वर्कशॉपमध्ये फायरमॅन आहे. ३३ वर्षीय मोहनलालने सांगितलं की “आमच्यापैकी ३५० मजूर मायदेशी परतले आहे. तर, ६०० मजूर परतण्याच्या तयारी असून त्यांनी त्यासाठी स्वतःचं नाव नोंदवलं आहे. परंतु, काही मजूर इस्रायलची अलर्ट सिस्टिम, सायरन व मिकलातमुळे स्वतःला सुरक्षित मानत आहेत. १३ जून रोजी इराणने इस्रायलवर हल्ला केला त्या रात्री आम्हाला अनेक वेळा शेल्टर्समध्ये जावं लागलं होतं. त्या दिवसापासून अनेकजण घाबरले आहेत. युद्ध चालू होतं तेव्हा सतत शेल्टर्सकडे धाव घ्यावी लागत होती. आता त्याचं प्रमाण कमी झालं आहे.