करोना प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढलेली असून देशात तसेच जगभरात करोना रुग्णांची संख्यादेखील कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशात करोनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यासह देशातील सर्व निर्बंध जवळपास उठवण्यात आले आहेत. आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला असून तब्बल २५ महिन्यांच्या बंदीनंतर पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं येत्या २७ मार्चपासून सुरु होतील. सरकारच्या या निर्णयामुळे आता परदेशगमन सोपे होणार असून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर इतर देशातील तसेच भारतीय हवाई वाहतूक कंपन्यांना पूर्वनियोजित विमानोड्डाण करता येईल. तसेच इतर देशातील विमानेदेखील भारतात उतरु शकतील. “जगभरात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. याच कारणामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी प्रतिक्रिया सरकारच्या निर्णयाबद्दल बोलताना हवाई वाहतूकविषयक अधिकाऱ्याने दिली. तर विमानांच्या उड्डाणांना परवानगी दिलेली असली तरी आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागेल, असे सरकारने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.

या आधी करोनाची लाट ओसरल्यानंतर केंद्र सरकार १५ डिसेंबर २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेणार होते. मात्र ओमिक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावानंतर सरकारने हा निर्णय घेण्याचे टाळले होते. कोरोना महामारीची लाट आल्यानंतर २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी होती. तर २० जुलैपासून बायोबबलमध्ये राहून ४० देशांत काही विमानांच्या विशेष उड्डाणाला परवानगी होती.