जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. पुलवामा येथील बमनू परिसरात सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. अजूनही चकमक सुरू असून दोन अतिरेक्यांना घेरण्यात आल्याचे सांगण्यात येते. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव किफायत असल्याचे समजते.

दरम्यान, अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने शनिवारी सकाळी लष्कर ए तोएबाचा टॉप कमांडर बशीर लष्करीसह दोन दहशतवाद्यांना यमसदनास धाडले. गेल्या महिन्यात सहा पोलिसांना जिवे मारण्याच्या घटनेत बशीरचाही समावेश होता. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा पर्याय बनलेल्या बुरहान वानी आणि सबझार अहमद बटच्या खात्म्यानंतर भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश असल्याचे मानले जाते.

शनिवारी सकाळी सुरक्षा दलांनी लष्करी आणि इतर ३ दहशतवाद्यांना एका घरात घेरले होते. पण स्थानिक लोकांच्या विरोधामुळे जवानांना ऑपरेशन राबवण्यात मोठी अडचण येत होती. अशा परिस्थितीतही जवानांना बशीर लष्करीला ठार करण्यात यश मिळाले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एका महिलेसमवेत दोन नागरिकांचाही मृत्यू झाला होता.