तीन दिवसांनंतरही अटक नाही; हल्लेखोरांची ओळख पटल्याचा पोलिसांचा दावा

नवी दिल्ली : जेएनयूच्या आवारात रविवारी झालेल्या हिंसक हल्ल्याप्रकरणी तीन दिवसांनंतर बुधवारी देखील कोणाला अटक करण्यात आली नाही. मात्र, या घटनेतील काही हल्लेखोरांना ओळखण्यात यश आले असून या प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल असा दावा दिल्ली पोलिसांनी केला.

तोंडाला मास्क लावून लोखंडी सळ्या, काठय़ा घेऊन जमावाने साबरमती ढाब्यावर केलेल्या हल्ल्यात किमान ३६ विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले होते. त्यात ‘जेएनयूएसयू’च्या अध्यक्ष आइषी घोष यांचे डोके फुटले होते. हा हल्ला उजव्या विचारांच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. या हल्ल्याची जबाबदारी मात्र हिंदू रक्षा दल यांनी घेतली आहे.

हल्लेखोरांना अटकाव करण्यात अपयश आलेल्या दिल्ली पोलिसांनी आइषी घोष यांच्याविरोधातच मंगळवारी गुन्हा दाखल केला. त्याला प्रत्युत्तर देत घोष यांनी देखील बुधवारी पोलिसांत तक्रार केली असून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच, जबरदस्तीने कोंडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांकडे हल्ल्याच्या संदर्भात बुधवारी एकूण ११ तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी ३ अभाविप तर ७ ‘जेएनयूएसयू’च्या विद्यार्थ्यांच्या आहेत. या तक्रारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे अधिक तपासासाठी वर्ग करण्यात आल्या आहेत.

जेएनयूच्या आवारात बुधवारी देखील आंदोलन कायम होते. जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही निदर्शने केली. अन्य काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दिल्याने जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अधिकाधिक सहानुभूती मिळू लागली आहे. जेएनयूमध्ये हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता पोलीस दक्ष असून विद्यापीठाच्या आवारातील हालचालींवर नजर ठेवली जात आहे.

दीपिका भाजपकडून लक्ष्य

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने मंगळवारी जेएनयूला भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर तिच्यावर भाजपच्या नेत्यांनी तीव्र टीका करण्यास सुरुवात केली असून ‘तुकडे तुकडे गँग’ला दीपिकाने समर्थन दिले असून तिच्या आगामी ‘छपाक’ सिनेमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश भधुरी यांनी केले आहे. भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा, केंद्रीयमंत्री शहानवाझ हुसेन आदींनीही डाव्या विचारांच्या संघटनांवर तोंडसुख घेतले. भाजप नेत्यांच्या विधानावर टिप्पणी करताना केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, त्यांची विधाने वाचलेली नाहीत. पण, फक्त कलाकारच नव्हे, कोणीही सामान्य व्यक्ती स्वत:चे मत मांडण्यासाठी कुठेही जाऊ शकतो, त्याला कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही.

कुलगुरुंचा संताप

जेएनयूचे कुलगुरू एम. जगदेश कुमार यांनी बुधवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालायचे प्रधान सचिव अमित खरे यांची भेट घेतली. जेएनयूच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यावर कुलगुरुंनी संताप व्यक्त केला. आंदोलकांना समर्थन देणाऱ्यांना मी विचारू इच्छितो की, ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करायचे आणि ज्या शिक्षकांना शिकवायचे आहे त्यांना त्यांच्या हक्कांपासून का वंचित ठेवता? या विद्यार्थी-शिक्षकांना का पाठिंबा देत नाही, असा सवाल कुलगुरुंनी केला. जेएनयू तात्पुरते बंद ठेवण्याची मागणी होत असल्याचे विचारताच, विद्यापीठ बंद ठेवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना सत्र नोंदणी करायची असेल त्यांना ती शक्य व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.   विद्यार्थ्यांनी झाल्या गोष्टी विसरून पुन्हा विद्यापीठात यावे असे आवाहन जगदीश कुमार यांनी मंगळवारी केले होते. जे विद्यार्थी जखमी झाले त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जी घटना झाली ती दुर्दैवी होती. सर्व विद्यार्थ्यांनी  परत यावे कारण जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सुरक्षित आहे. झाले गेले विसरून विद्यार्थ्यांनी परत यावे असे त्यांनी स्पष्ट केले होते.