पीटीआय, बंगळुरू
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपण पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रीपदावर राहू असे सांगितल्यावर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी माझ्याकडे काही पर्याय आहे का? मला त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल, त्यांना पाठिंबा द्यावा लागेल, असे वक्तव्य बुधवारी केले.
मुख्यमंत्र्यांच्या विधानाबद्दल शिवकुमार यांना पत्रकारांनी विचारले असता सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही आक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जे काही सांगेल आणि त्यांना जे काही हवे असेल, ते पूर्ण केले जाईल, असे शिवकुमार म्हणाले.
पक्ष तुम्हाला पाठिंबा देत नाही का? तुमचे समर्थक तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रही आहेत, असे विचारले असता पक्षासाठी केलेल्या त्यागाबद्दल त्यांनी माहिती दिली. याबाबत मला काहीही चर्चा करायची नाही, असे त्यांनी सांगितले.
चिक्काबल्लापुरा येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ते पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पदावर राहणार असल्याचे सांगितले होते.