Karnataka High News : एखाद्या व्यक्तीला न्यायालयाने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली तर काय होईल? न्यायालयावर कारवाई होईल का? न्यायालय भरपाई देतं का? माफी मागतं का? असे प्रश्न अनेकांना पडतात. न्यायालयाकडून अशा चुका झाल्या आहेत का? असाही प्रश्न आपल्या डोक्यात येतो. अशीच एक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. कर्नाटकमधील कुशलनगरमधील सुरेश नावाच्या आदिवासी तरुणाला त्याच्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. त्याने १८ महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याची पत्नी जीवंत असल्याचं समोर आलं. परिणामी सुरेशने उच्च न्यायालयाकडे ५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

कर्नाटकमधील कुशलनगर तालुक्यातील बसवनहळ्ळी गावातील रहिवासी कुरुबारा सुरेशला त्याच्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली. दीड वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर त्याची पत्नी जीवंत असल्याचं समजताच सुरेशने कर्नाटक उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं असून भरपाई म्हणून पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे.

खूनाचा तपास करणाऱ्या पोलिसांविरोधात कारवाईची मागणी

म्हैसूरमधील पाचव्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने याप्रकरणी सुरेश याला खूनाच्या आरोपातून मुक्त केलं होतं. तसेच गृह विभागास सुरेशला एक लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला होता. मात्र, या तुटपुंज्या भरपाईने सुरेश समाधानी झाला नाही. त्याने उच्च न्यायालयाकडे दाद मागितली आहे. त्याने ५ कोटी रुपयांची भरपाई मागितली असून कथित खूनाच्या खटल्याचा तपास करणाऱ्या पाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुरेशने म्हटलंय की “मला त्या पोलिसांनी न केलेल्या गुन्ह्यात अडकवलं आणि माझ्याविरोधात खोटे पुरावे देखील सादर केले.”

सुरेशने त्याच्या याचिकेत पोलीस निरीक्षक प्रकाश बी. जी., तत्कालीन पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश यात्तिमानी, महेश बी. के. आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर यांची नावं नमूद केली आहेत. सत्र न्यायालयाने केवळ पोलीस निरीक्षक प्रकाश बी. जी. यांच्याविरोधात पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपांप्रकरणी कारवाई करण्याची शिफारस केली होती. मात्र सुरेशने पाचही पोलिसांविरोधात सारखेच आरोप केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीड वर्षांनी पत्नी हॉटेलमध्ये जेवताना दिसली

सुरेशने २०२१ मध्ये त्याची पत्नी मल्लिगे बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. वर्षभराने बाजूच्या जिल्ह्यातील बेट्टाडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या मृतदेहाचे अवशेष (हाडांचा सापळा) सापडले. पोलिसांनी हा मल्लिगेचा सापळा असल्याचा अंदाज व्यक्त केला. पोलिसांच्या दबावामुळे सुरेशची साासू गौरी हिने हा तिच्या मुलीचा सापळा असल्याचं सांगितलं. पोलिसांनी डीएनए चाचणी केली नाही. केवळ गौरीच्या जबाब घेऊन पोलिसांनी सुरेशला अटक केली. मात्र, दोन वर्षांनी सुरेशची पत्नी मल्लिगे ही एका हॉटेलमध्ये जेवताना दिसली आणि पोलिसांचं बिंग फुटलं. सुरेशच्या नातेवाईकांनी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर सत्र न्यायलयाने सुरेशला खूनाच्या आरोपातून मुक्त केलं.