पुरस्काराचे ४७ वे मानकरी देशभक्तीपर भूमिकांनी ‘भारत कुमार’ म्हणून चाहत्यांकडून गौरविले गेलेले बुजूर्ग हिंदी चित्रपट कलावंत, निर्माता, पटकथाकार आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने गौरविले जाणार आहे. ‘भारतरत्न’ खालोखाल सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून प्रतिष्ठा लाभलेल्या या पुरस्कारात सुवर्णकमळ, दहा लाख रुपये रोख आणि शाल यांचा समावेश आहे. ७८ वर्षीय मनोज कुमार हे या पुरस्काराचे ४७ वे मानकरी आहेत. १९९२मध्ये पद्मश्री किताबाने त्यांचा केंद्र सरकारने गौरव केला होता. पाकिस्तानातील अबोटाबाद येथे जन्मलेले मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी. १९५७मध्ये ते चित्रपट सृष्टीत आले. १९६१मधील ‘काच की गुडियाँ’ चित्रपटाने त्यांच्याकडे रसिकांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर ‘हरियाली और रास्ता’, ‘डॉ. विद्या’ (१९६२), ‘घर बसा के देखो’, ‘गृहस्थी’(१९६३), ‘वो कौन थी’(१९६४) हे त्यांचे चित्रपटही गाजले. १९६५मध्ये आलेल्या ‘शहीद’ चित्रपटातील भगत सिंह यांच्या भूमिकेने मात्र त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली. त्यानंतर गुमनाम, पूनम की रात, दो बदन, सावन की घटा, पत्थर के सनम, अनिता, नीलकमल, शोर, संन्यासी अशा अनेक चित्रपटांत त्यांनी नायकाच्या भूमिका केल्या, तरी उपकार, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान आणि क्रांती या चित्रपटांनी त्यांची देशभक्त नायकाची भूमिका जनमानसावर ठसवली. विशेष म्हणजे या चारही चित्रपटांतील त्यांच्या व्यक्तिरेखेचे ‘भारत’ हे नाव होते. ‘शिर्डी के साईबाबा’ या त्यांच्या चित्रपटाने साईबाबांची प्रतिमा जगभर पोहोचवली. या चित्रपटाची पटकथा त्यांची होती. ‘मैदान ए जंग’ हा १९९५मधील चित्रपट हा त्यांचा कलावंत म्हणून आतापर्यंतचा अखेरचा चित्रपट आहे. १९९९ मध्ये पुत्र कुणाल गोस्वामीसाठी त्यांनी ‘जयहिंद’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. पाचजणांची समिती ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी जाणकारांच्या समितीकडून निवड केली जाते. यंदा लता मंगेशकर, आशा भोसले, सलीम खान, नितीन मुकेश आणि अनूप जलोटा या पाच सदस्यीय समितीने ही निवड केली. माझ्या घरी अभिनंदनाचे दूरध्वनी खणखणू लागले तेव्हा मला प्रथम वाटलं की ही अफवाच असेल. नंतर प्रत्यक्ष बातमी पाहिली तेव्हा विश्वास बसला. हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. तो आनंद पचवू द्या, मग बोलेन! - मनोज कुमार