सुख के सब साथी….अशीच काहीशी अवस्था झालीये फेसबुक सीईओ मार्क झुकेरबर्गची. सुखात सोबत असणारे अडचणीत मात्र साथ सोडत असल्याचा अनुभव मार्क झुकेरबर्गला येत आहे. डेटा लीक प्रकरणानंतर मार्क झुकेरबर्ग एकाकी पडलेला पहायला मिळत आहे. टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीतील फार कमी लोकांनी मार्क झुकेरबर्गची बाजू घेतलीये. अॅपलचे सीईओ टीम कूक, टेस्लाचे एलॉन मस्क आणि सेल्सफोर्स.कॉमचे मार्क बेनिऑफ यांनीही केम्ब्रिज अॅनालिटीका डेटा लीक प्रकरणावरुन मार्क झुकेरबर्गवर टीका केली आहे.

फेसबुकवर टीका होत असताना क्षेत्रातील इतर सहकारी कंपन्यांनी शांत बसणं पसंत केलं आहे. अनेकदा अशा परिस्थिती सर्व कंपन्या एकत्र येऊन बाजू मांडताना दिसतात, मात्र फेसबुकच्या बाबतीत उलटं घडताना दिसतंय.

सध्या फेसबुक आपली मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत २० कोटी युजर्सचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करण्याचा प्रयत्न करत आहे. डेटा केम्बिज अॅनालिटिका कंपनीने ५ कोटी युजर्सचा डेटा कोणतीही परवानगी न घेता चोरल्याने फेसबुकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. फेसबुकला सुरक्षेसाठी कोणत्या उपययोजना केल्या आहेत, तसंच कोणत्या नव्या तांत्रिक पद्धती अवलंबल्या जात आहेत याची माहिती अमेरिकन काँग्रेसने देण्यास सांगितलं आहे. यावेळी मार्केटमधील सहकारी कंपन्या एकतर शांत आहेत किंवा उघडपणे टीका करत आहेत. अनेकदा मार्केटमधील एखाद्या कंपनीवर संकट आल्यानंतर इतर कंपन्या एकत्र येऊन सोबत देताना दिसतात. ज्याप्रमाणे अॅपलने आयफोनच्या सुरक्षेवरुन एफबीआयशी लढा दिला होता.

‘गोपनीयतेचं रक्षण करणं व्यवसायासाठी कधीही चांगलं आहे’, असं इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाऊंडेशनचे गेन्नी यांनी म्हटलं आहे. ‘युजर्स सध्या फेसबुकने जे केलंय ते इतर कोणी करणार नाही ना याची काळजी घेत असून टीम कूक, एलॉन मस्क यांच्याकडे पर्याय म्हणून पाहत आहेत’, असंही त्यांनी सांगितलं आहे.

एफबीआय आयफोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करत असताना अॅपलने मात्र युजरची वैयक्तिक माहिती देण्यास नकार दिला होता. यावेळी अॅपलने एफबीआयविरोधात पुकारलेल्या लढ्याला फेसबुकने साथ दिली होती. फेसबुकने कूक यांच्या भूमिकेला समर्थन देत अल्फाबेटच्या गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर कंपन्यांसोबत अॅपलला साथ दिली होती.

कूक यांना जेव्हा फेसबुक डेटा लीकप्रकरणी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी डेटा सुरक्षेसाठी कडक नियम करण्याची गरज असल्याचं सांगितलं. सोबतच आपण मार्क झुकेरबर्गच्या जागी असतो तर असं केलं नसतं असंही ते बोलले आहेत. फेसबुक डेटाच्या सहाय्याने जाहिरातीमधूल पैसे कमवत असताना, तर अॅपलचा आर्थिक फायदा हा आयफोन, आयपॅड आणि मॅक या प्रोडक्टसमधून येतो. केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर गेल्या दोन आठवड्यात फेसबुकचे शेअर्स १६ टक्क्यांनी घसरले होते.