राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांचीही उपस्थिती

करोनाची दुसरी लाट चालू असताना लांबणीवर टाकण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांबाबत रविवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी दिली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री व सचिव यांनी बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. पोखरियाल यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व इतरांकडून समाजमाध्यमातून त्यांचे म्हणणे मागवले होते.

निशांक यांनी सांगितले, की ही आभासी बैठक उद्या होणार असून राज्यांचे शिक्षण मंत्री, सचिव, राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष, इतर संबंधित यांची उपस्थिती अपेक्षित आहे. बारावीची परीक्षा व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा या दोन्ही मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे. आपण याबाबत राज्यांच्या शिक्षण सचिवांशी बोललो असून उच्चस्तरीय  बैठकीतही सल्लामसलतीची प्रक्रिया चालू राहिल. ही आभासी बैठक सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात शालेय शिक्षण विभाग व सीबीएसइ यांनी परीक्षा घेण्याबाबतचे पर्याय निवडावेत, त्यात विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षिततेचा विचार करावा असे म्हटले आहे.

दरम्यान उच्च शिक्षण मंत्रालय उच्च शिक्षण संस्थांच्या प्रवेश परीक्षांबाबत विचार करीत आहे. करोना साथीमुळे शैक्षणिक क्षेत्रातील अनेक विभागांवर परिणाम झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत सीबीएसई व आयसीएसइच्या बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या असून नॅशनल टेस्टिंग एजन्सी व इतर राष्ट्रीय संस्थांच्या प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षांचा परिणाम इतर राज्य मंडळांवर व इतर प्रवेश परीक्षांवर होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे.  सीबीएसईने दहावीची परीक्षा १३ एप्रिलला रद्द केली होती, तर बारावीची परीक्षा लांबणीवर टाकली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत तो निर्णय घेण्यात आला होता. एरवी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात या परीक्षा होतात.