जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱया कलम ३७० यावर सध्या राजकीय क्षेत्रात टीका-प्रतिटीकांचे वारे वाहत आहेत. त्यात नरेंद्र मोदींवर जम्म-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी कडाडून टीका करत मोदी दहा वेळा जरी पंतप्रधान झाले तरी, त्यांना कलम ३७० उठविता येणार नाही असे म्हटले आहे.
समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांनी भारत-पाकिस्तानच्या निवृत्त लष्करी अधिकाऱयांची त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलविली होती. त्यावेळी फारुख अब्दुल्ला उपस्थित होते.
फारुख अब्दुल्ला म्हणाले, “नरेंद्र मोदींना दहा वेळा पंतप्रधानपद भूषविण्याची संधी मिळाली तरी त्यांना कलम ३७० उठविता येणार नाही. प्रत्येक विषयावर चर्चा घडवून आणण्याची भाजपची मागणी असते.परंतु, ते स्वत:च कधी त्याबाबत पुढाकार घेऊन चर्चा करण्याच्या तयारीत नसतात.” दोन्ही लष्कराच्या अधिकाऱयांसमोर काश्मीर प्रकरणी बोलताना, ते (पाकिस्तान) कधीही काश्मीर आपल्या ताब्यात घेऊ शकणार नाही. हे मी माझ्या रक्ताने लिहून देण्यास तयार आहे. असेही ते म्हणाले. त्याचबरोबर माझ्या आजोबांची लाहोरला कबर आहे. परंतु, अजूनही त्यांच्या कबरीला भेट देण्याची परवानगी मला पाकिस्तान सरकारने दिलेली नाही. याचे मला दु:ख असल्याचे फारुख अब्दुल्ला म्हणाले.
पाकिस्तानला भिती असलेल्या चिनाब, झेलम आणि सिंधू नदींचे पात्रे वळवून पाकिस्तानात पाण्याची टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न नवी दिल्ली कधीही करणार नाही. असेही अब्दुल्ला म्हणाले.