नवी दिल्ली : गेल्या ११ वर्षांत देशाने पारदर्शक, संवेदनशील असे सुशासनाचे प्रारूप अनुभवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. देशव्यापी पायाभूत सुविधांतील व्यापक बदलांसाठी समग्र दृष्टिकोन ठेवून सरकार काम करीत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
कर्तव्य भवनाच्या पहिल्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर कर्तव्य पथ येथील कार्यक्रमात पंतप्रधानांनी हा प्रकल्प देशाच्या दूरदृष्टीची साक्ष असल्याचे सांगितले. यापूर्वी प्रशासकीय कारभार ब्रिटिशकालीन इमारतींमधून चालविला जात. अपुरी जागा, अंधार , हवा खेळती राहण्यास वाव नाही अशी स्थिती होती. आम्ही एकत्र काम करून यात बदल करण्याचा निर्धार केला.
आता कर्तव्य भवनमधून विकसित भारताच्या दृष्टीने धोरणात्मक दिशादर्शन केले जाईल असे पंतप्रधानांनी सांगितले. भारताबरोबर ज्यांना स्वातंत्र्य मिळाले त्यांनी अधिक प्रगती केली, त्या वेगाने आपण का पुढे जाऊ शकलो नाही? याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे असे पंतप्रधानांनी नमूद केले. सध्याच्या समस्या भावी पिढ्यांवर सोडता कामा नये, ही आपली जबाबदारी असल्याचे मोदींनी सांगितले.
सातशे अतिरिक्त जवान तैनात
समाईक केंद्रीय सचिवालयाच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने केंद्रीय औद्याोगिक सुरक्षा दलाच्या ७०० अतिरिक्त जवानांच्या तैनातीला परवानगी दिली. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व दहा कार्यालयांना ही सुरक्षा असेल. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आधिपत्याखाली ते कार्यरत असतील. गृह मंत्रालयाने सुरक्षेसाठी एकूण ७३५ जवानांना संमती दिली. जशा इमारती तयार होतील तशी सुरक्षा वाढवली जाणार आहे.