पीटीआय, बीजिंग/ मॉस्को : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्काचे अस्त्र सोडल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी देश असलेल्या रशिया आणि चीन यांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. चीनशी संबंध ताणलेले असतानाही अमेरिकेविरोधात त्यांनी भारताला पाठिंबा दर्शवला. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता असून त्यांच्या भेटीचे चीनने स्वागत केले. तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी मोदी यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला.

सात वर्षांहून अधिक काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) तियानजिन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस चीनला जाण्याची अपेक्षा आहे. हा कार्यक्रम एकता, मैत्री आणि फलदायी निकालांचा मेळावा असेल.’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सांगितले.

सर्व एससीओचे सर्व सदस्य देश आणि १० आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख यांसह २० हून अधिक देशांचे नेते या कार्यक्रमांना उपस्थित राहतील.

एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदींनी जून २०१८ मध्ये चीनचा दौरा केला होता. मात्र पूर्व लडाख सीमेवरील संघर्षामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे आहेत. पूर्व लडाखमध्ये मे २०२० मध्ये लष्करी संघर्ष सुरू झाला आणि त्याच वर्षी जूनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षांमुळे संबंधांत कटुता वाढली.

मोदी-पुतिन यांच्यात चर्चा

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. भारत-रशिया यांच्यातील विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी वचनबद्धतेची दोन्ही नेत्यांनी पुष्टी केली. पुतिन यांनी मोदींना युक्रेनशी सुरू असलेल्या त्यांच्या देशाच्या संघर्षाची माहिती दिली. पंतप्रधानांनी या समस्येच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदींनी या वर्षाच्या अखेरीस २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी राष्ट्रपती पुतिन यांना भारतात आमंत्रित केले.

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशीही चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण, शेती, आरोग्य यांच्यातील संबंधांमध्ये सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शविली.

शस्त्रास्त्र खरेदी थांबवल्याचे वृत्त निराधार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के कर लावण्याची घोषणा केल्यानंतर भारत अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी थांबवण्याची योजना आखत आहे, असा दावा करणाऱ्या वृत्ताचे संरक्षण मंत्रालयाने खंडन केले. ‘रॉयटर्स’च्या एका वृत्तात दावा करण्यात आला आहे की भारताने नवीन अमेरिकी शस्त्रे आणि विमाने खरेदी करण्याची योजना थांबवली आहे. मात्र हे वृत्त असत्य व निराधार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

भारताशी चर्चा नाही ट्रम्प

‘आयात शुल्काची समस्या सुटेपर्यंत भारताशी व्यापारावर चर्चा करण्याची शक्यता नाही,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टम्प यांनी स्पष्ट केले. भारतावर ५० टक्के आयातशुल्क लावल्यानंतर भारताशी व्यापारावरील चर्चेने वेग घेतला आहे का, या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. भारताने मात्र ५० टक्के आयातशुल्क अनावश्यक आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. ‘भारतावर लादलेले अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्क हा राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित मुद्दा असून, भारताने रशियाकडून तेलखरेदी थांबविण्यास नकार दिल्याशी तो संलग्न मुद्दा आहे,’ असे वक्तव्य ‘व्हाइट हाउस’चे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो यांनी केले.