पीटीआय, ढाका

बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी हिंदू समाजातील प्रमुख व्यक्तींची येथील प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरात भेट घेतली. बांगलादेशमध्ये हिंदू समुदायाविरोधात झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वाचा मानला जातो. सरकारच्या कामगिरीबाबत भाष्य करण्यापूर्वी नागरिकांनी संयम ठेवावा, असे आवाहन युनूस यांनी केले.

युनूस यांनी ८ ऑगस्टला अंतरिम सरकारचे प्रमुख या नात्याने सूत्रे हाती घेतली. तत्कालीन शेख हसीना सरकारविरोधातील संघर्षादरम्यान अनेक ठिकाणी अल्पसंख्याक हिंदू समाजाची मंदिरे, त्यांच्या मालमत्ता तसेच व्यापारी आस्थापनांचे जमावाने नुकसान केले होते. त्यामुळे युनूस यांनी हिंदू समाजाशी ढाकेश्वरी मंदिरात संवाद साधला. हे मंदिर महत्त्वाचे शक्किपीठ मानले जाते. आम्ही जर अपयशी ठरलो तर टीका करा, असे आवाहन युनूस यांनी यावेळी केले.

हेही वाचा >>>Ladki bahin yojana : “..तर ‘लाडकी बहीण योजना’ बंद करण्याचे आदेश देऊ”, महाराष्ट्र सरकारवर ‘सर्वोच्च’ ताशेरे

हिंदूंनी गेल्या आठवड्यात ढाका तसेच चितगाव येथे तीव्र निदर्शने केली होती. हिंदू समाजाला संरक्षण द्यावे अशी निदर्शकांची मागणी होती. दंगलखोरांवर कारवाईसाठी विशेष लवाद स्थापन करा, अल्पसंख्याकांना संसदेत १० टक्के जागा आरक्षित करा, अशा काही मागण्या त्यांनी केल्या होत्या. बांगलादेशच्या ५२ जिल्ह्यांत अल्पसंख्याकांवर हल्ल्याच्या २०५ घटना ५ ऑगस्टपर्यंत घडल्या असे दोन हिंदू संघटनांनी नमूद केले. त्यामुळे युनूस यांनी ढाकेश्वरी मंदिरात संवाद साधला. लोकशाहीत आपली ओळख धर्मावरून नव्हे तर माणूस म्हणून हवी. आपले हक्क अबाधित राहायला हवेत असे युनूस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बांगलादेशात मंदिरे झालेल्या हल्ल्यांबाबत अंतरिम सरकारने मदतीसाठी संपर्क क्रमांक तयार केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेख हसीना यांच्यावर खुनाचे आरोप

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य सहा जणांविरोधात खुनाच्या आरोपांखाली खटला चालवला जाईल अशी माहिती तेथील न्यायालयीन अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. इतर सहा जणांमध्ये दोन वरिष्ठ मंत्री आणि बडतर्फ केलेले पोलीस प्रमुख यांचा समावेश आहे. शेख हसीना यांनी ५ ऑगस्टला राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.