Mohammed Shami and Hasin Jahan Court Case: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात सात वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे. दरम्यान कोलकाता उच्च न्यायालयाने काल (१ जुलै) या प्रकरणात निर्णय देत असताना पत्नी हसीन जहाँ आणि मुलीला दरमहा देखभाल खर्च म्हणून मोठी रक्कम देण्याचा निर्णय दिला. पत्नी हसीन जहाँसाठी दरमहा दीड लाख रुपये तर अल्पवयीन मुलीसाठी दरमहा अडीच लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये दरमहा देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला.

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार मुखर्जी यांच्या खंडपीठाने हसीन जहाँ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. १ जुलै रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले की, याचिकाकर्त्या क्रमांक एक (पत्नी हसीन जहाँ) यांना दरमहा १,५०,०००/- रुपये आणि तिच्या मुलीला दरमहा २,५०,०००/- रुपये देणे हे दोन्ही याचिकाकर्त्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करेल.

न्यायालयाने असेही नमूद केले की, शमी त्याच्या मुलीसाठी ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक शैक्षणिक किंवा इतर खर्च स्वेच्छेने करू शकतो.

२०१८ साली अलीपूर सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात पत्नी हसीन जहाँला दरमहा ५०,००० आणि मुलीला ८०,००० देण्याचे निर्देश दिले होते. या निकालाविरोधात हसीन जहाँने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पत्नी हसीन जहाँने स्वतःसाठी ७ लाख रुपये आणि मुलीसाठी ३ लाख रुपये दरमहा भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती.

हसीन जहाँने आपल्या वकिलामार्फत युक्तिवाद केला की, २०२१ साली मोहम्मद शमीने प्राप्तीकर भरल्यानुसार त्याचे वार्षिक उत्पन्न अंदाजे ७.१९ कोटी रुपये किंवा दरमहा ६० लाख रुपये आहे. तसेच हसीन जहाँने दावा केला की, तिच्या मुलीसह त्यांचा एकत्रित खर्च दरमहा ६ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

या तपशीलाचा विचार करून उच्च न्यायालयाने हसीन जहाँच्या बाजूने निकाल दिला असल्याचा अंदाज आहे. तसेच उच्च न्यायालयाने अलीपूर सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मोहम्मद शमीचे वाढलेले उत्पन्न आणि जहानने पुनर्विवाह केलेला नसल्याचा मुद्दाही विचारात घेण्यात आला. यावरून उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल बदलला.

नेमके प्रकरण काय?

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचे लग्न ७ एप्रिल २०१४ रोजी झाले होते. लग्न करण्यापूर्वी हसीन जहाँ कोलकाता नाईट रायडर्ससाठी मॉडेल आणि चीअरलीडर म्हणून काम करत होती. २०१५ साली या जोडप्याने मुलीला जन्म दिला. मात्र त्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले.

२०१८ साली हसीन जहाँने मोहम्मद शमीवर घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ आणि मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. मोहम्मद शमीने एका पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेतले असल्याचा आरोप जहाँने केला होता. या आरोपानंतर बीसीसीआयने मोहम्मद शमीबरोबरचा करार स्थगित केला होता. या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर त्याच्याशी पुन्हा करार करण्यात आला. तसेच हसीन जहाँनेही नंतर हे आरोप मागे घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान