ही हिंदुत्वाचीच देण; सरसंघचालक भागवत यांना असदुद्दीन ओवेसींचं प्रत्युत्तर

सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं

mohan bhagwat statement about mob lynching, asaduddin owaisi reaction
सरसंघचालक भागवत यांनी केलेल्या विधानाला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘झुंडबळीच्या गुन्ह्यात सहभागी असलेले लोक हिंदू नाहीत; ते हिंदुत्वविरोधी आहेत. हिंदू-मुस्लीम वेगळे नाहीत, ते एक आहेत. सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ एकच आहे,’ असं सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचं आवाहन केलं. सरसंघचालक भागवत यांनी केलेल्या विधानाला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भेकडपणा, हिंसा आणि हत्या करणं, हे गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचाच अविभाज्य भाग आहे. मुस्लिमांचे झुंडबळीही याच विचाराचे परिणाम आहेत,” अशी टीका ओवेसी यांनी सरसंघचालकांवर केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील मुस्लीम राष्ट्रीय मंचने ‘हिंदुस्थान फर्स्ट, हिंदुस्थानी बेस्ट’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांना भयाच्या चक्रातून बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी झुंडबळींवरही त्यांनी भाष्य केलं होतं. मोहन भागवत यांनी मांडलेल्या भूमिकेवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली. ओवेसी यांनी ट्विट करत सरसंघचालकांवर निशाणा साधला.

हेही वाचा- झुंडबळी घेणारे हिंदुत्वविरोधी!; सरसंघचालकांचे प्रतिपादन

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भागवत यांनी सांगितलं की, ‘झुंडबळी घेणारे हिंदुत्वविरोधी आहेत.’ या गुन्हेगारांना गाय आणि म्हैस यांच्यातील फरक कळत असेल, पण हत्या करण्यासाठी जुनैद, अखलाक, पहलू, रकबर, अलिमुद्दीन यांची नावं पुरेशी होती. हा द्वेष हिंदुत्ववादाची देण आहे. या गुन्हेगारांना हिदुत्ववादी सरकारचं पाठबळ आहे,” असा आरोप ओवेसी यांनी केला.

“केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते अलीमुद्दीनच्या गुन्हेगारांना हार घातले जातात. अखलाकची हत्या करणाऱ्याच्या मृतदेहावर तिरंगा पांघरला जातो. आसिफला मारणाऱ्यांच्या समर्थनार्थ महापंचायत बोलावली जाते. जिथे भाजपाचाच प्रवक्ता म्हणतो की,’आम्ही हत्या पण करू शकत नाही का?’ भित्रेपणा, हिंसा आणि हत्या करणं, हे गोडसेच्या हिंदुत्वावादी विचारांचाच हा अविभाज्य भाग आहे. मु्स्लिमांचे झुंडबळी याचं विचारांचे परिणाम आहेत,” अशी टीका ओवेसी यांनी सरसंघचालकांना प्रत्युत्तर देताना केली.

मोहन भागवत काय म्हणालेत?

“सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच आहे. त्यामुळे ‘भारतात इस्लाम धोक्यात’ या भयचक्रात मुस्लीमांनी अडकू नये, असे आवाहनही त्यांनी केले. हिंदू-मुस्लीमांमधील संघर्षांवर विसंवाद नव्हे, तर संवाद हाच एकमेव उपाय आहे. आपण लोकशाही देशात आहोत. त्यामुळे देशात हिंदू किंवा मुस्लीम यांचे वर्चस्व असू शकत नाही, तर देशात केवळ भारतीयांचेच वर्चस्व असले पाहिजे. ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. परंतु एकीचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचे संचित असले पाहिजे”, असं भागवत म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mohan bhagwat statement about mob lynching asaduddin owaisi reaction bmh

ताज्या बातम्या