नौदलाच्या शस्त्रसंभारात आणखी एका नव्या पाणबुडीची भर पडणार आहे. माझगाव डॉकने आज कलवरी वर्गातील चौथी पाणबुडी ही नौदलाकडे सुपुर्त केली. याआधी आयएनएस कलवरी, खांदेरी, करंज या पाणबुड्या नौदलाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या चौथ्या पाणबुडीचे ‘आयएनएस वेला’ असं नामकरण केलं जाणार आहे. लवकरच आयएनएस वेला नौदलात दाखल होण्याचा सोहळा नौदलातर्फे पार पडला जाईल.

आयएनएस वेला या पाणबुडीच्या बांधणीला साधारण २०१७ मध्ये सुरुवात झाली, ६ मे २०१९ ला या पाणबुडीचे जलावतरण झाले. यानंतर सुरुवातीला किनाऱ्याजवळच्या चाचण्या आणि त्यानंतर खोल समुद्रातील चाचण्या घेण्यात आल्या. करोना काळातही या चाचण्यांमध्ये खंड पडला नाही. सखोल चाचण्यांनंतर, सर्व उपकरणांची तपासणी केल्यानंतरच नौदलाने ही पाणबुडी स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पाणबुडीची बांधणी करणाऱ्या माझगाव डॉकतर्फे आज आयएनएस वेला ही नौदलाकडे सुपुर्त करण्यात आली आहे.

डिझेल इलेक्ट्रिक प्रणालीवर चालणाऱ्या कलवरी वर्गातील पाणबुड्या या जगात उत्कृष्ठ समजल्या जातात. फ्रान्स देशाच्या स्कॉर्पिन पाणबुडीच्या तंत्रज्ञानावर आधारीत कलवरी वर्गीतील पाणबुड्यांची निर्मिती माझगाव डॉकमध्ये सुरु आहे. फ्रान्स देशासोबत २००५ मध्ये पाणबुड्या बांधण्याबाबत तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करार झाला होता. कलवरी वर्गातील आणखी दोन पाणबुड्यांची बांधणी युद्धपातळीवर सुरु आहे.