पीटीआय, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला नीट-पीजी २०२५ परीक्षा ३ ऑगस्ट रोजी एकाच सत्रात घेण्यास शुक्रवारी परवानगी दिली. न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने प्रारंभीच्या सुनावणीत मंडळाने परीक्षा घेण्यासाठी मागितलेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिकच्या कालावधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच परीक्षा घेण्यासाठी आणखी वेळ दिला जाणार नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वी न्यायालयाने ३० मे रोजी झालेल्या सुनावणीत दोन सत्रांत परीक्षा आयोजित करण्याच्या मंडळाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.

परीक्षा एकाच सत्रात घ्यायची असल्याचे आणि सुमारे १,००० परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी परीक्षा घेणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद मंडळातर्फे करण्यात आला. तसेच परीक्षा ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत घेण्यात येईल. ही परीक्षा तंत्रज्ञान भागीदार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टीसीएस)ने दिलेली तारीख असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले होते. या याचिकेत ३ ऑगस्ट रोजी परीक्षा आयोजित करण्यासाठी परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचाही उल्लेख केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी कठोर परिश्रम केले आहेत त्यांना त्रास सहन करावा लागेल आणि त्यांची निवड प्रक्रियादेखील विलंबित होईल, अशी टिप्पणी करीत खंडपीठाने परीक्षा आयोजित करण्याच्या दीर्घ कालावधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देशही दिले.