New Parliament Building : २८ मे रोजी देशाच्या नव्या संसदेचं उद्घाटन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भवनाचं उद्घाटन केलं जाणार आहे. सेंट्रल व्हिस्टा या नावाने हा प्रकल्प ओळखला जातो आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संसद भवनाचं उद्घाटन करणार असल्याने १९ विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या सगळ्या पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. इतके विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात का गेले आहेत? जाणून घ्या

२१ मे रोजी राहुल गांधींनी केलं होतं एक ट्वीट

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाविषयी राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की या भवनाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाही. हे ट्वीट राहुल गांधी यांनी २१ मे रोजी केलं होतं. यानंतर हा मुद्दा आणखी पुढे आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद भवनाचं उद्घाटन करण्याचा विरोधकांनी विरोध दर्शवला.

ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसदेचं उद्घाटन करणं हे घटनेला धरुन नाही अशी भूमिका मांडली होती. जेव्हा या संसद भवनाच्या बांधकामाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं तेव्हाही राष्ट्रपतींना बोलावलं गेलं नाही. तसंच आता संसद भवन बांधून पूर्ण झालं या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यालाही राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. या सोहळ्यापासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना दूर ठेवणं योग्य नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे असंही शर्मा यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ट्वीट केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना या सोहळ्याला का बोलावलं नाही असा सवाल केला. राष्ट्रपती या भारताच्या प्रथम नागरिक आहेत त्यांनाच या सोहळ्याला बोलावणं आवश्यक आहे तरीही त्यांना का बोलावलं नाही ही बाब लोकशाही मूल्यांना धरुन नाही असं ट्वीट खरगेंनी केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी पक्षांनी मिळून एक पत्रही जारी केलं आहे

नव्या संसद भवनाचं उद्घाटन हा देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा सोहळा आहे. देशात लोकशाही धोक्यात आहे तरीही आम्ही या नव्या संसद भवन निर्मितीबाबत काही बोललो नाही. आपल्या देशासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहणार होतो. मात्र या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच निमंत्रण देण्यात आलेलं नाही. नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. ही बाब म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीवर थेट हल्ला आहे. संसद खिळखिळी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रपतींना न बोलवणं हा लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. आम्ही त्यामुळेच या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे असं पत्रक विरोधी पक्षांनी जारी केलं आहे.