‘इस्राो’ने अमेरिकेच्या ‘नासा’बरोबर तयार केलेला ‘निसार’ हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह ‘जीएसएलव्ही-एफ १६’ रॉकेटच्या सहाय्याने बुधवारी अवकाशात यशस्वीपणे सोडण्यात आला. अमेरिका आणि भारताच्या अवकाश संशोधन संस्थांनी संयुक्तपणे या उपग्रहाची निर्मिती केली आहे. ‘इस्राो’ने या यशस्वी प्रक्षेपणाची माहिती दिली.

‘इस्राो’च्या ‘जीएसएलव्ही एफ-१६’ रॉकेटने ‘निसार-नासा-इस्राो-सिंथेटिक अॅपर्चर रडार’ उपग्रह १९ मिनिटांचा आणि ७४५ किलोमीटर अंतर प्रवास करून ‘सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट’मध्ये (एसएसपीओ) सोडले. प्रक्षेपणाची उलटगणती २७.३० तासांपूर्वी सुरू करण्यात आली. हे रॉकेट ५१.३ मीटर उंच असून, तीन टप्प्यांचे आहे. ‘निसार’ या उपग्रहाचे वजन २,३९३ किलो इतके आहे. चेन्नईपासून १३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अवकाश प्रक्षेपकामधून बुधवारी सायंकाळी ५.४० वाजता रॉकेट अवकाशात सोडण्यात आले. रॉकेटपासून उपग्रह वेगळा झाल्यानंतर शास्त्रज्ञांना उपग्रह पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी काही दिवस लागतील.

‘इस्राो’ची यापूर्वी १८ मे रोजी झालेली ‘पीएसएलव्ही-सी ६१/ईओएस-०९’ मोहीम अयशस्वी ठरली होती. ‘पीएसएलव्ही’ रॉकेटच्या सहाय्याने पृथ्वी निरीक्षण उपग्रह निर्धारित कक्षेत सोडण्यात अपयश आले होते. ‘निसार’ उपग्रहाचा वापर पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे.

उपग्रहाची उद्दिष्टे

● ‘निसार’चे आयुर्मान पाच वर्षांचे असेल. या काळात हा उपग्रह पृथ्वीचा अभ्यास करून येथील विविध बदल टिपेल.

● पृथ्वीवरील जमीन आणि हिमाच्छादनाचे स्वरूप, जमिनीची परिसंस्था, भारत व अमेरिका या दोघांच्या हिताच्या असलेल्या महासागराच्या भागांचा अभ्यास करणार

● वृक्षाच्छादित भाग अचूक मोजणे, पीक लागवडींमधील बदल टिपणे आदी उद्दिष्टेही उपग्रह पूर्ण करणार आहे.

● अंटार्क्टिका भागातील अनेक छायाचित्रे घेता येणार. येथील हिमाच्छादन कशा पद्धतीने बदलत आहे, ते याद्वारे समजेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इस्राो’, ‘नासा’चे योगदान

● ‘इस्राो’- ‘एस-बँड रडार यंत्रणा’, ‘डेटा हँडलिंग अँड हाय-स्पीड डाउनलिंक यंत्रणा’, अवकाशयान आणि प्रक्षेपक यंत्रणा ‘इस्राो’ने विकसित केली आहे. उपग्रहाच्या कार्यक्षमतेची जबाबदारी ‘इस्राो’वर आहे.

● ‘नासा’ – ‘एल-बँड रडार यंत्रणा’, ‘हाय स्पीड डाउनलिंक यंत्रणा’, ‘सॉलिड स्टेट रेकॉर्डर’, ‘जीपीएस रिसीव्हर’, ‘बूम हॉइस्टिंग’, ‘रिफ्लेक्टर’ अमेरिकेच्या ‘नासा’ने विकसित केले आहे. कक्षेतील नियोजन आणि रडार यंत्रणेतील नियोजन ‘नासा’ करणार आहे.

● ‘निसार’ मोहिमेमध्ये उपग्रहातून छायाचित्रे घेण्यासाठी ‘इस्राो’ आणि ‘नासा’ या दोन्ही अवकाश संस्था एकमेकांना सहकार्य करणार आहे.