scorecardresearch

अदानीप्रकरणी चर्चेच्या नोटिसा फेटाळल्या

राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अदानी प्रकरणावर चर्चेसाठी नियम २६७ नुसार दिलेल्या ११ नोटिसा सभापती जगदीप धनखड यांनी मंगळवारी फेटाळून लावल्या.

adani-group
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली

राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अदानी प्रकरणावर चर्चेसाठी नियम २६७ नुसार दिलेल्या ११ नोटिसा सभापती जगदीप धनखड यांनी मंगळवारी फेटाळून लावल्या. अदानी प्रकरणावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी संसदेच्या आवारात जोरदार निदर्शने, फलकबाजी केली. राहुल गांधी यांच्या लंडनमधील विधानांवरून त्यांच्या माफीनाम्याची मागणी सत्तारुढ भाजपने केली असून त्यावरूनही राज्यसभेत गदारोळ सुरूच राहिला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य लंडनमध्ये केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी, या सत्तारुढ भाजपच्या मागणीवरून राज्यसभेत मंगळवारी पुन्हा घोषणाबाजी, गदारोळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.राज्यसभेत राहुल गांधी यांच्या माफीनाम्यासाठी सत्तारुढ सदस्यांनी घोषणाबाजी केल्याने प्रारंभी कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.दुपारी २ वाजता कामकाज सुरू होताच सभापती जगदीप धनखड यांनी देशवासियांना चैत्र सुखाडी, गुढीपाडवा, उगाडी, चेटी चांद, नाव्हरे आणि साजिबू चेईराओबो या सणांनिमित्त शुभेच्छा दिल्या. या सणांनिमित्त सभागृहाला बुधवारी सुटी राहील आणि गुरुवारी कामकाज होईल, असे त्यांनी सांगितले. एकीकडे विरोधकांची घोषणाबाजी सुरू असतानाच सभापतींनी पुढील कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची संधी दिली. खरगे म्हणाले की, राहुल गांधी हे या सदनाचे सदस्य नसल्यामुळे त्यांनी येथे माफी मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्या वेळी सत्तारुढ सदस्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी म्हणून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळात धनखड यांनी कामकाज गुरुवापर्यंत तहकूब केले.

तत्पूर्वी नियोजित कामकाज स्थगित करून अदानी प्रकरणावर चर्चा व्हावी, या मागणीसाठी विरोधी सदस्यांनी दिलेल्या नियम २६७ अंतर्गतच्या नोटिसा सभापती धनखड यांनी फेटाळून लावल्या होत्या. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या जागेवर उभे राहून घोषणा दिल्या. कामकाज तहकूब करण्याआधी धनखड यांनी दुपारी ११.३० वाजता आपल्या दालनात विविध पक्षाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते.

नियम २६७ च्या नोटिसा दिलेल्या सदस्यांत अमी याज्ञिक, प्रमोद तिवारी, तिरुची सिवा, कुमार केतकर, नीरज डांगी, राजनित रंजन, जेबी माथूर हिशाम, संजय सिंह आदींचा समावेश होता. अदानी समूहाविरुद्धच्या कंपनी गैरव्यवहार, राजकीय भ्रष्टाचार, भांडवली बाजारातील लबाडी, आर्थिक गैरव्यवस्थापन या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) नियुक्ती करण्यात सरकारला अपयश आल्याबद्दल चर्चा करावी, असे काही विरोधी सदस्यांच्या नोटिशीत म्हटले होते. हिंडेनबर्ग अहवालाची सत्यता तपासण्यासाठी जेपीसीमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या दैनंदिन देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी माकपचे एलामारम करीम यांनी केली होती. आपचे संजय सिंह यांनी महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये वीजनिर्मिती आणि वितरणात या समूहाने कथितरित्या घोटाळा केल्याचे नोटिशीत नमूद केले होते. या सर्व ११ नोटिसा धनखड यांनी फेटाळून लावल्या. त्याआधी धनखड म्हणाले की, लोकांना राज्यसभेच्या कामकाजात शिस्त आणि गंभीर चर्चा अपेक्षित आहे.

संसद आवारात फलकबाजी, निदर्शने
अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी विरोधी सदस्यांनी मंगळवारी संसद भवनाच्या आवारात घोषणाबाजी केली. संसद भवनाच्या पहिल्या मजल्यावरून मोठा फलकही फडकावण्यात आला. आम्हाला संसदीय समिती पाहिजे आहे, असे त्यावर लिहिले होते. तृणमूल काँग्रेसने स्वतंत्रपणे निदर्शने केली. अदानीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे, अशी मागणी तृणमूल सदस्यांनी केली.

राहुल गांधी आजचे ‘मीर जाफर’- पात्रा
नवी दिल्ली : राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील मीर जाफर असल्याची टीका भाजपने केली आहे. भारतात नवाबपद मिळण्यासाठी मीर जाफर याने परकीय मदत मागितली होती, असा इतिहास सांगितला जातो. राहुल गांधी यांनी लंडन दौऱ्यातील भाषणात भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे म्हटले होते. त्याबद्दल राहुल यांनी माफी मागितली पाहिजे, या मागणीचा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी पुनरुच्चार केला. राहुल यांचे लंडनमधील वक्तव्य हे मीर जाफरसारखेचे कृत्य आहे, अशी टीका त्यांनी केली. बंगालमधील सिराज उदौलाच्या सैन्यात मीर जाफर हा सरदार होता. त्याने प्लासीच्या लढाईत सिराज उदौलाविरोधात इंग्रजांना मदत करून बंगालचे नवाबपद पदरात पाडून घेतले होते.

संसदेत प्रत्युत्तराचा अधिकार- राहुल
नवी दिल्ली : लोकसभेत काही ज्येष्ठ मंत्र्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या पूर्णत: निराधार अशा आरोपांना संसदेत प्रत्युत्तर देण्याचा मला अधिकार आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यासंदर्भात राहुल यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात नियम ३५७ चा दाखला दिला आहे. त्यानुसार मला वैयक्तिक स्पष्टीकरणाची मुभा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. संसदीय परंपरा, घटनेत अंतर्भूत असलेले नैसर्गिक न्यायाचे तत्त्व आणि लोकसभा कामकाजाचा नियम ३५७ नुसार आपणास स्पष्टीकरण देण्याची मुभा द्यावी, असे राहुल यांनी पत्रात म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर भाजप खासदार रवि शंकर प्रसाद यांनाही अशी वैयक्तिक स्पष्टीकरणाची परवानगी मिळाली होती.

समेटाची बैठक निष्फळ
नवी दिल्ली : संसदेतील कोंडी फोडून कामकाजाचा मार्ग मोकळा करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीतून कोणताही तोडगा निघू शकला नाही. या बैठकीत सत्तारूढ भाजप आघाडी तसेच विरोधी सदस्य आपापल्या भूमिकांवर ठाम राहिले. काँग्रेससह काही विरोधी पक्ष अदानी प्रकरणातील मागण्यांवर ठाम राहिले. त्याला भाजप सदस्यांनी विरोध केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 02:08 IST

संबंधित बातम्या