नवी दिल्ली : अमेरिकेत करोना विषाणूचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने तेथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत, मागील वर्षांच्या तुलनेत १३ टक्के कमी भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनच्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी विद्यार्थी संख्या कमी होण्यासाठी करोना महासाथीला जबाबदार धरले आहे.

अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या चीनमधील आहे. ओपन डोर्स संस्थेच्या २०२१ च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थी संख्येशी संबंधित संस्थांचे हे अहवाल सोमवारी माध्यमांसमोर प्रसिद्ध केले. ते म्हणाले की, केवळ या वर्षीच्या उन्हाळ्यात ६२ हजारांहून अधिक जणांना विद्यार्थी व्हिसा जारी करण्यात आला आहे. जारी केलेल्या व्हिसाची ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. व्हिसा जारी केलेल्यांपेक्षा कमी विद्यार्थी भारतातून अमेरिकेत गेले. यावरून असे दिसून येते की भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेण्यास उत्सुक आहेत परंतु करोना उद्रेकामुळे ते  संकोच करतात.

अमेरिकेच्या दूतावासातील सांस्कृतिक आणि शिक्षण सल्लागार अँथनी मिरांडा यांच्या मते, यावरून विद्यार्थ्यांचा अमेरिकेमधील अभ्यासाकडे सकारात्मक दृष्टिकोन  दिसून येते. ते म्हणाले, करोनाचा परिणाम जगभरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, प्रवासावर झाला आहे.

याचा फटका अमेरिकेलाही बसला आहे. त्यामुळे जगातील देशांतून अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

करोना साथीचा परिणाम

* २०२०-२१ या वर्षांत अमेरिकेत जाणाऱ्या एकूण भारतीयांच्या संख्येत १३ टक्के घट झाली आहे.

* अमेरिकेत पोहोचलेल्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी घट झाली आहे.

* अमेरिकेत शिकणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ९ लाख १४ हजारांपेक्षा जास्त आहे हे उल्लेखनीय. यापैकी भारतीय विद्यार्थी सुमारे २० टक्के (एक लाख ६७ हजार ५८२) आहेत.