नवी दिल्ली : मतदानयंत्राच्या सदोषत्वाचा मुद्दा विरोधकांनी गुरुवारी पुन्हा चर्चेत आणला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत विरोधकांनी दूरस्थ मतदानयंत्रांच्या संभाव्य वापरावर तीव्र आक्षेप घेतला.
या बैठकीमध्ये काँग्रेसचे दिग्विजय सिंह, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, कपिल सिबल, भाकपचे डी. राजा, माकपचे एलामारम करीम, भारत राष्ट्र समितीचे केशव राव, शिवसेनेचे (ठाकरे गट) अनिल देसाई आदी विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते. पण, तृणमूल काँग्रेसने या बैठकीकडे पाठ फिरवली. बैठकीमध्ये मतदान यंत्रांच्या सदोषत्वासंदर्भात सविस्तर चर्चा होणार होती. मात्र, दिवसभरातील राजकीय घडामोडींमुळे ही बैठक फारवेळ चालली नाही. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही पवार, सिबल आदी नेत्यांनी राहुल गांधींच्या मुद्दय़ावर भाष्य करणे टाळले. देशांतर्गत स्थलांतरितांना मतदारसंघात न जाता दूरस्थ मतदान यंत्रांच्या आधारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्रीय निवडणूक आयोग केला आहे. आयोगाने बोलावलेल्या बैठकीमध्ये राजकीय पक्षांनी सादरीकरण पाहण्यासही नकार दिला होता. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांनी आयोगाकडे विरोधी मते मांडली होती. जगात कुठेही निवडणुकीसाठी मतदानयंत्राचा वापर केला जात नाही. मग, भारतातच मतदानयंत्रे का वापरली जातात? मतदानयंत्राबाबतचे आक्षेप एकदा निवडणूक आयोगाकडे नोंदवायचे आहेत. आयोगाने शंकांचे निरसन केले नाही तर याबाबत राजकीय भूमिका घ्यावी लागेल.-कपिल सिबल, खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ