नवी दिल्ली: राज्यातील नवनियुक्त आमदारांसाठी अडीच वर्षांनंतर दोन दिवसांची संसदीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असली तरी, इथे होणाऱ्या दोन राजकीय भोजनांकडे लक्ष वेधले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सर्व पक्षीय आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. तर, काँग्रेसचे लोकसभेतील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी बुधवारी काँग्रेस आमदारांसाठी श्रमपरिहाराचे आयोजन केले आहे.

सोनियांच्या भेटीची प्रतीक्षा

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे १२ मंत्री असले तरी, पक्षाच्या २०-२५ आमदारांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. या आमदारांच्या वतीने भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी २२ मार्च रोजी सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होते. संसदीय कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी आमदार दिल्लीत आले असले तरी पक्षश्रेष्ठींकडून त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आलेली नाही. धानोरकर यांनीही स्वपक्षीय मंत्र्यांविरोधात सोनियांकडे भेटीची वेळ मागितली होती. काँग्रेस अंतर्गत नाराजीमुळे धानोरकर यांच्या स्नेहभोजनाकडेही लक्ष असेल.

मान्यवरांचे मार्गदर्शन

संसदेच्या परिसरात होणाऱ्या कार्यशाळेत राज्यातील सर्व पक्षांचे ७०-८० आमदार सहभागी होणार आहेत. त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, भगवान कराड, खासदार वंदना चव्हाण आदी मार्गदर्शन करणार आहेत. संसदीय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या (प्राइड) वतीने ही कार्यशाळा होणार असून मंगळवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला व राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल. विधान परिषदेचे सभापती रामराज नाईक-िनबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मंत्री अनिल परब, आदिती तटकरे हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती विधिमंडळाच्या वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदाने यांनी दिली.

सांगता समारंभासाठी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू उपस्थित राहणार आहेत.