scorecardresearch

“२१ ऑक्टोबर २०१८ चा दिवस मी विसरू शकत नाही, लाल किल्ल्यावर…”, सुभाषचंद्र जयंतीदिनी पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

नेताजी सुभाष यांच्या ‘कॅन डू, विल डू’ ही प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे,” असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

(फोटो – ट्विटर)

इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी जनतेशी संवाद साधला. त्यांनी नेताजींच्या डिजीटल पुतळ्याचे म्हणजेच होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “ज्या नेताजींनी आपल्याला स्वतंत्र आणि सार्वभौम भारताचा विश्वास दिला, ज्यांनी मोठ्या अभिमानाने, आत्मविश्वासाने आणि धैर्याने इंग्रजांसमोर सांगितले की मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही, मी ते मिळवीन. हा पुतळा स्वातंत्र्याच्या महान नायकाला कृतज्ञ राष्ट्राकडून श्रद्धांजली आहे. नेताजी सुभाष यांचा हा पुतळा आपल्या लोकशाही संस्थांना, आपल्या पिढ्यांना राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देईल. येणाऱ्या आणि आताच्या पिढीला प्रेरणा देत राहील.”

“गेल्या वर्षी देशाने नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यास सुरुवात केली. आज सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कारही या निमित्ताने प्रदान करण्यात आला आहे. नेताजींच्या जीवनातून प्रेरणा घेऊन हे पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. आम्ही सुधारणांवर भर दिला आहे तसेच मदत, बचाव आणि पुनर्वसन यावर भर दिला आहे. आम्ही देशभरात एनडीआरएफचे बळकटीकरण, आधुनिकीकरण, विस्तार केले. तंत्रज्ञानापासून नियोजन आणि व्यवस्थापनापर्यंत सर्वोत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्यात आला. याआधी प्रत्येक चक्रीवादळात शेकडो लोकांचा मृत्यू होत असे, मात्र गेल्या काही काळात आलेल्या चक्रीवादळात असे घडले नाही. प्रत्येक आव्हानाला देशाने नव्या ताकदीने उत्तर दिले. या आपत्तींमध्ये आम्ही शक्य तितके जीव वाचवू शकलो,” असं पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

“स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापूर्वी नवीन भारत घडवण्याचे ध्येय आपल्यासमोर आहे. नेताजींचा देशावर विश्वास होता, त्यांच्या भावनांमुळे मी असे म्हणू शकतो की जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी भारताला हे ध्येय गाठण्यापासून रोखू शकेल. आझादीच्या अमृत महोत्सवात हा संकल्प केला आहे की भारत आपली ओळख आणि प्रेरणा पुन्हा जिवंत करेल. स्वातंत्र्यानंतर देशाच्या संस्कृती आणि संस्कारांसोबतच अनेक महान व्यक्तींचे योगदान पुसून टाकण्याचे काम केले गेले, हे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यलढ्यात लाखो देशवासीयांच्या तपश्चर्येचा समावेश होता, परंतु त्यांचा इतिहासही मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न झाला. पण आज स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतर देश त्या चुका दुरुस्त करत आहे,” असं मोदींनी सांगितलं.

“गेल्या वर्षी याच दिवशी मला नेताजींच्या कोलकाता येथील वडिलोपार्जित निवासस्थानी जाण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. ज्या गाडीतून ते कोलकाता सोडून निघाले ती गाडी, ती खोली, ज्या खोलीत तो अभ्यास करत असे, त्यांच्या घराच्या पायऱ्या, त्या घराच्या भिंती, त्यांचं दर्शन हा सगळा अनुभव शब्दांपलीकडचा आहे. आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा २१ ऑक्टोबर २०१८ चा दिवसही मी विसरू शकत नाही. लाल किल्ल्यावर आयोजित एका विशेष समारंभात मी आझाद हिंद फौजेची टोपी परिधान करून तिरंगा फडकवला होता. तो क्षण अद्भुत, अविस्मरणीय आहे. नेताजी सुभाष यांनी काही करण्याचा निश्चय केला तर कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकत नव्हती. नेताजी सुभाष यांच्या ‘कॅन डू, विल डू’ ही प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे,” असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm modi inaugurates netaji hologram statue at india gate hrc

ताज्या बातम्या