देशात आज लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आता १ जून रोजी शेवटचा टप्पा संपन्न होईल. त्यामुळे निवडणुकीचा प्रचारही शेवटचे काही दिवस उरला आहे. बिहारच्या पाटणा येथे एका जाहीर सभेला संबोधित करत असताना मोदींनी इंडिया आघाडीला इंडी आघाडी असे म्हणत टीका केली. विरोधकांकडून सातत्याने आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की, मतपेटीचे राजकारण करत असताना इंडी आघाडी ‘त्यांच्यासमोर’ मुजरा करत आहे. पतंप्रधान मोदींच्या या नव्या विधानामुळे आता वाद निर्माण झाला असून काँग्रेस नेत्यांनीही या विधानावर पलटवार केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पाटणा येथील जाहीर सभेत बोलताना त म्हणाले, इंडिया आघाडीला मतपेटीची गुलामी करायची असेल त्यांच्यासमोर जाऊन मुजरा करायचा असेल तर करावा. मी मात्र एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणासाठी खंभीरपणे उभा आहे. राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेसने एकत्र येऊन यादव, कुर्मी, कुशवाहा, तेली, कान्हू, निषाद आणि पासवान या समाजाच्या आरक्षणावर दरोडा घातला. संविधानानुसार धर्माच्या आधारावर कुणालाही आरक्षण देता येत नाही. पण काँग्रेसने मतपेटीच्या राजकारणासाठी कायद्यात बदल केला.

“आधी तुमचा देश सांभाळा”, निवडणुकीवर भाष्य करणाऱ्या पाकिस्तानी नेत्याला अरविंद केजरीवालांनी सुनावले

एससी-एसटी-ओबीसींचे अधिकार अबाधित ठेवणार – मोदी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आरजेडी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीला संविधान बदलून संपूर्ण देशात धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे आहे, या सत्यापासून ते तोंड लपवू शकत नाहीत. मी आज बिहारच्या या सामाजिक न्यायाच्या पूण्य भूमीतून संपूर्ण देश आणि बिहारला एक गॅरंटी देऊ इच्छितो. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत एससी, एसटी, ओबीसी आणि अतिमागास वर्गाच्या अधिकारांना कुणालाही हिसकावू देणार नाही. ही मोदी गॅरंटी आहे.”

“माझ्यासाठी संविधान सर्वप्रथम आहे. माझ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे आहेत. इंडिया आघाडीला मतपेटीची गुलामी करायची असेल तर त्यांनी करावी, त्यांच्यासमोर जाऊन मुजरा करावा. मी मात्र वंचितांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिल”, अशा शब्दात मोदींनी इंडिया आघाडीवर टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उन्हात प्रचार केल्यामुळे मोदींच्या डोक्यावर परिणाम

पंतप्रधान मोदींच्या टीकेचा समाचार काँग्रेसकडून घेण्यात आला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, आज पंतप्रधानांच्या तोंडून मुजरा शब्द ऐकला. मोदीजी तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे? काही घेत का नाहीत? अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी त्यांना तात्काळ उपचार मिळवून द्यावेत. कदाचित उन्हात सतत प्रचार केल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना उन्हात प्रचार करायची सवय नसेल.