भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी आपल्याच सरकारच्या आर्थिक नितीवर टीका करून पक्षाची नाराजी स्वीकारली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट लक्ष्य केले नसले तरी अर्थमंत्री अरूण जेटलींवर टीका करत अप्रत्यक्षरित्या मोदींवरही निशाणा साधला होता. आता यशवंत सिन्हा आणि पंतप्रधान मोदी हे दि. १४ ऑक्टोबर रोजी बिहारमधील पाटणा येथे होणाऱ्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. बिहारमधील सर्वांत जुने विद्यापीठ पाटणा विद्यापीठाच्या शतकपूर्ती निमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदींशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यपाल सत्यपाल मलिक हेही उपस्थित असतील.

पाटणा विद्यापीठाचे कुलगुरू रासबिहारी प्रसाद सिंह यांनी ‘द टेलिग्राफ’ला म्हटले की, पंतप्रधान मोदींना मुख्य कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. पंतप्रधान कार्यालयानेही पंतप्रधान येणार असल्याचे म्हटले आहे. तर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना निमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले. जर मोदी आणि सिन्हा दोघेही कार्यक्रमात सहभागी झाले तर मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या शाब्दिक युद्धानंतरची दोघांची ही पहिलीच भेट ठरेल.

काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये एक लेख लिहून देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका केली होती. सुरूवातीला नोटाबंदी नंतर लगेचच जीएसटी लागू करून केंद्र सरकारने देशाच्या औद्योगीक विकासात खोडा घातल्याचा आरोप केला होता. देशाच्या घसरलेल्या जीडीपीसाठी मोदी सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले होते.