लवकरच पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून राजकीय पक्ष त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. यादरम्यान निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोऱ यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा तसंच आपल्या विश्रांतीचा काळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशांत किशोर यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशांत किशोर यांनी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असून पुढील वर्षी मार्चच्या आधी कोणतंही काम हाती न घेण्याचा निर्णय घेतला आहे. “पक्षाच्या आत किंवा बाहेर ती कोणतीही भूमिका ते बजावणार नाहीत. त्यांनी याआधीच आपण जे काम करत होतो त्यामधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. भविष्यात ते काय करणार आहेत याबद्दल सध्या बोलणं जरा घाईचं होईल,” असं सूत्राने सांगितलं आहे.

याचा स्पष्ट अर्थ प्रशांत किशोर उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधआनसभा निवडणुकांमध्ये कोणतीही भूमिका निभावणार नाहीत. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर प्रशांत किशोर यांनी निवृत्ती जाहीर केली होती. “मी बराच काळ निवृत्तीचा विचार करत होतो, बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने मली ही संधी मिळाली आहे,” असं ते म्हणाले होते.

प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होत्या. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे सेमी-फायनल म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांचं दूर राहणं विरोधी पक्षांना थोडं सतावणारं आहे.

उत्तर प्रदेशात भाजपा पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असून समाजवादी पक्ष कमबॅक करण्याची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसही निवडणूक जिंकत पुन्हा एकदा आपली जागा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.