प्रसारमाध्यमांना भेटत नसल्याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर नेहमीच टीका केली जाते. या टीकेच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांनी नवीन वर्षांत जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानपदाचा दोनदा कार्यकाळ सांभाळणाऱ्या मनमोहन सिंग यांनी पत्रकारांशी खूपच कमी संवाद साधला. त्यामुळे लोकसभा निवडणुका जवळ आल्या असल्यामुळेच पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना भेटण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेची तारीख आणि जागा अद्याप निश्चित झालेली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मे २००९ मध्ये पंतप्रधानपदाचा दुसरा कार्यकाळ सांभाळायला घेतल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग हे पाच संपादक आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना अनुक्रमे केवळ एकदाच भेटले आहेत. मात्र नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. त्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांच्या या पत्रकार परिषदेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भ्रष्टाचार, महागाई आदी मुद्दय़ांवर जनतेचा रोष ओढवून घेतलेल्या यूपीए सरकारला लकवा मारल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच होणाऱ्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान या मुद्दय़ांवर पत्रकारांच्या प्रश्नाला कसे सामोरे जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2013 रोजी प्रकाशित
पंतप्रधान मनमोहन सिंग जानेवारीत प्रसारमाध्यमांना सामोरे जाणार
प्रसारमाध्यमांना भेटत नसल्याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर नेहमीच टीका केली जाते. या टीकेच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांनी नवीन वर्षांत जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे.

First published on: 27-12-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister manmohan singh to address media in january