राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन सध्या खूपच खल सुरु आहे. राहुल गांधींनी अधिकृतपणे राजीनामा दिल्यानंतरही अद्याप त्यांची मनधरणी करण्याचे काम काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरु आहे. दरम्यान, राहुल यांच्यानंतर आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रियंका गांधी यांचीच नियुक्ती व्हावी, अशी अपेक्षा मध्य प्रदेशचे मंत्री आणि काँग्रेसचे आमदार सज्जन सिंह वर्मा यांनी व्यक्त केली आहे.

मध्य प्रदेश सरकारमध्ये सार्वजनीक बांधकाम मंत्री असलेले सज्जन सिंह वर्मा यांनी सोमवारी प्रियंका गांधींनीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे सांभाळावीत अशी आपली इच्छा व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, काँग्रेसचे रक्त धमन्यांमध्ये असणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष नेहरु-गांधी कुटुंबियांव्यतिरिक्त पाहणे अशक्य आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की प्रियंका गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारायला हवी, असे ट्विट त्यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्विकारत गेल्या आठवड्यात राहुल गांधींनी अधिकृतपणे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या भविष्यातील वाढीसाठी याची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याने मी राजीनामा दिला आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

राहुल गांधी यांनी अधिकृतपणे राजीनामा देण्याआधी गांधी कुटुंबाच्या समर्थनार्थ आणि पक्षाची पुनर्रचना करताना मोकळीक मिळावी यासाठी पक्षातील १२० विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले होते. दरम्यान, राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पक्षाच्या पुनर्रचनेत त्यांना केंद्रीय स्तरावर महत्वाची भुमिका मिळू शकते. त्याचदिवशी काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. लोकसभेसाठी त्यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांना आपला करिष्मा दाखवता आला नव्हते. त्यामुळे त्यांनी जनमताचा आदर असल्याचे सांगत याची जबाबदारी स्विकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.