नवी दिल्ली : सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची दिल्लीत भेट घेऊन तासभर चर्चा केली. ज्ञानव्यापी मशिद प्रकरण, कर्नाटकमधील हिजाबचा वाद आणि भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे वादग्रस्त विधान या घटनांच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिमांशी संवादप्रक्रिया कायम ठेवण्याचा प्रयत्न  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भेटीतून केल्याचे मानले जाते.

इमाम इलियासी यांनी सरसंघचालकांना भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या निमंत्रणाचा आदर राखून सरसंघचालकांनी गुरुवारी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीमध्ये इमामांची भेट घेतली. ‘सरसंघचालक समाजातील विविध लोकांना भेटत असतात. इमामांशी झालेली भेट आणि चर्चा हा याच संवादप्रक्रियेचा भाग आहे’, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

पूर्वीही संवाद

इमाम इलियासी यांनी यापूर्वीही संघाशी आणि भाजपच्या नेत्यांशी संवाद साधला होता. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशीही त्यांचा संवाद होता. ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे विद्यमान प्रमुख इमान उमर अहमद इलियासी यांचे वडील मौलाना जमील अहमद इलियासी यांनी ही संघटना स्थापन केली. मौलाना जमील इलियासी यांचे माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांच्याशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. या दोघांमध्ये अनेकदा विविध मुद्दय़ांवर चर्चा झाल्या होत्या. २००९ मध्ये इलियासी यांच्या अंत्यसंस्कारासाठी सुदर्शन हे नागपूरहून दिल्लीला आले होते. ‘माझा भाऊ गेला’, अशा शब्दांत सुदर्शन यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. इमाम इलियासी आणि सरसंघचालक भागवत यांच्यातील गुरुवारच्या भेटीमुळे त्यांच्यातील संवादाची परंपरा कायम असल्याचे मानले जाते.

बुद्धिजीवींशी चर्चा

गेल्या महिन्यामध्ये माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, अलीगढ विद्यापीठाचे माजी कुलगुरू जमीरुद्दीन शाह आणि व्यापारी सईद शेरवानी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी अनेक वादग्रस्त मुद्दय़ांवर प्रदीर्घ चर्चा केली होती. मुस्लिम बुद्धिजीवींनी सरसंघचालकांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांच्या विनंतीनुसार २२ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम बुद्धीजिवींशी चर्चा केली होती. बुद्धिजिवींशी झालेल्या चर्चेमध्ये गोहत्या, लव-जिहाद, द्वेषाचे राजकारण आदी संवेदनशील मुद्दय़ांवर मते मांडली गेली. विविध समाजघटकांनी सलोख्याने राहिले पाहिजे, त्यासाठी एकमेकांकडे खुलेपणाने पाहिले पाहिजे, तर देशात शांततेचे वातावरण कायम राहील, असे मत सरसंघचालकांनी मुस्लिम बुद्धिजिवींच्या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते.

सरसंघचालक राष्ट्रपिता : इलियासी

‘‘सरसंघचालक राष्ट्रपिता आहेत. त्यांच्या भेटीमुळे समाजामध्ये योग्य संदेश दिला गेला आहे. देवाची उपासना करण्याच्या पद्धती वेगवेगळय़ा असल्या तरी, मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. आम्ही दोघेही देशाच्या हितालाच प्राधान्य देतो’’, असे इमाम इलियासी म्हणाले. त्यावर, देशाचे राष्ट्रपिता एकच असल्याचे नमूद करत, भागवत यांनी आपण सर्व भारताची लेकरे आहोत, असे स्पष्ट केले.