नवी दिल्ली : भारत व अमेरिका यांच्यातील संबंध हे महत्त्वाचे असून करोनाकाळात भारताने केलेली मदत आम्ही विसरणार नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी त्यांचे समपदस्थ जयशंकर यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, की करोनाचा भारत व अमेरिका या दोन्ही देशांना जबर फटका बसला. या काळात भारताने आम्हाला मदत केली, या मदतीची परतफेड अमेरिकेने करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला केलेल्या मदतीत आम्ही पूर्ण केली.

दोन्ही देशात प्रादेशिक सुरक्षेसह अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर चर्चा झाली. अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर लष्करी तोडगा असूच  शकत नाही, तर त्यावर राजकीय तोडगा काढावा लागेल, या जयशंकर यांच्या मताशी त्यांनी सहमती  दर्शवली. तालिबान व अफगाणिस्तान सरकार यांनी समोरासमोर येऊन शांतता पाळण्यास वचनबद्धता दर्शवण्याची गरज आहे. अफगाणिस्तानातील पुढील सरकार हे सर्वसमावेशक व अफगाणी लोकांसाठी प्रातिनिधिक असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आता अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखालीच पुढची शांतता प्रक्रिया झाली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. अफगाणिस्तानात सैन्य माघारीनंतर आम्ही काही महत्त्वाचे कार्यक्रम राबवित आहोत व त्या देशाला विकास व सुरक्षेत मदत करीत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उच्चस्तरीय बैठकीनंतर जयशंकर यांनी सांगितले, की जागतिक व प्रादेशिक आव्हाने पेलण्यासाठी दोन्ही देशांनी मोठे काम केले आहे. बायडेन प्रशासनाने लस उत्पादनात भारताला कच्चा माल पुरवून मदत केली, त्याबाबत भारत अमेरिकेचा आभारी आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेची ही मदत मोलाची ठरली. विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याच्या संदर्भातही अमेरिकेने करोना काळात जी  संवेदनशीलता दाखवली त्याचाही जयशंकर यांनी उल्लेख केला.

दलाई लामांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी बुधवारी तिबेटी आध्यात्मिक धर्मगुरू दलाई लामा यांच्या एका वरिष्ठ प्रतिनिधीबरोबर बैठक घेऊन, तिबेटच्या मुद्दय़ावर बायडेन प्रशासनाचा पाठिंबा कायम राहणार असल्याचे संकेत दिले. या बैठकीत, तिबेटच्या अज्ञातवासातील सरकारमधील अधिकारी आणि दलाई लामा यांचे प्रतिनिधी न्गोडुप डोंगचुंग यांनी तिबेटी चळवळीला अमेरिकेने पाठिंबा कायम ठेवल्याबद्दल ब्लिंकन यांचे आभार मानले.

ब्लिंकन-डोभाल भेट

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील सुरक्षा स्थिती, प्रादेशिक प्रश्न तसेच द्विपक्षीय मुद्दय़ांवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. ब्लिंकन यांचे मंगळवारी सायंकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन झाले. अफगाणिस्तानातील सुरक्षा स्थिती अमेरिकी सैन्याच्या माघारीनंतर बदलत असताना त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

हिंद-प्रशांत क्षेत्रातील घडामोडी तसेच सहकार्य यावरही दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाली. अमेरिकेत बायडेन प्रशासनाने सत्ता ग्रहण केल्यानंतर ब्लिंकन यांची ही पहिलीच भारतभेट आहे, त्याआधी प्रशासनाच्या दोन उच्च अधिकाऱ्यांनी भारताला भेट दिली होती. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन तसेच हवामान बदल विषयक विशेष दूत जॉन केरी यांनी भारताला भेट दिली होती.

डोभाल व ब्लिंकन यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही, परंतु अफगाणिस्तानातील परिस्थिती, द्विपक्षीय संबंध याबाबत चर्चा झाल्याचा अंदाज आहे. दोन्ही नेत्यात द्विपक्षीय संबंध आणखी कसे वृद्धिंगत करता येतील याबाबतही चर्चा झाली. डोभाल यांना भेटण्यापूर्वी ब्लिंकन यांनी नागरी समुदायाच्या काही सदस्यांची भेट घेतली. ब्लिंकन  यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की भारत व अमेरिका हे दोन्ही देश लोकशाही मूल्यांसाठी वचनबद्ध असून दोन्ही देशातील संबंधांचा तो मूळ आधार आहे. आपण नागरी समुदायाच्या काही नेत्यांना भेटलो असून लोकशाही मूल्यांच्या पालनासाठी नागरी समुदाय मदत करीत आहे.