Supreme Court News Updates: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार यांनी बुधवारी एका वकिलाला चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. संबंधित वकिलाने न्यायालयाला सांगितले की, त्यांचे वरिष्ठ सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत कारण ते उच्च न्यायालयात एका खटल्याचा युक्तिवाद करत आहेत.
यावर न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार म्हणाले की, जर त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा अहंकार दुखावायचा नसेल तर त्यांनी अशी माहिती उघडपणे सांगणे टाळावे. यावेळी न्यायमूर्ती कुमार म्हणाले की न्यायाधीशांचा अहंकार खूप कमकुवत असू शकतो.
बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार म्हणाले, “तुम्ही इतके प्रामाणिक राहू नका. भविष्यात हे शिका. तुम्ही सर्वोच्च न्यायालयात कधीही असे म्हणू नये की, तुमचे वरिष्ठ वकील उच्च न्यायालयात व्यस्त आहेत. आमचा अहंकार खूप नाजूक आहे. तुम्हाला न्यायाधीशांचा अहंकार दुखावायचा नाही. अन्यथा तुमचा खटला गुणवत्तेच्या आणि दोषांच्या आधारावर चालणार नाही. पुन्हा अशा गोष्टी बोलू नका. थोडसे खोटे बोलले तरी चालते. तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला या गोष्टी शिकवायला हव्या होत्या.”
दरम्यान या प्रकरणातील संबंधित वकिलाने त्यांचे वरिष्ठ वकील वकील उच्च न्यायालयातील एका खटल्यात युक्तीवाद करत असल्याचे कारण देत सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने या खटल्याची सुनावणी १४ जुलैपर्यंत स्थगित केली. पण, मागणी करणाऱ्या वकिलाला चांगलेच सुनावले.
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोरही घडली होती अशीच घटना
सर्वोच्च न्यायालयात असा प्रकार घडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी २०२२ मध्येही सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, एका कनिष्ठ वकिलाने वरिष्ठ वकील उपस्थित नसल्याचे कारण देत सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यावेळी तत्कालीन माजी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने कनिष्ठ वकिलाला कोर्टरूम शिष्टाचाराची आठवण करून दिली होती.
अशा गोष्टी मांडायला शिका
त्यावेळी कनिष्ठ वकिलाने, त्यांचे वरिष्ठ वकील दुसरीकडे कुठेतरी व्यस्त आहेत आणि त्यामुळे सुनावणीला हजर राहू शकत नाहीत असे सांगितेल होते. यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी हसत उत्तर दिले, ‘तुम्ही या गोष्टी मांडायला शिकले पाहिजे. तुमचे वरिष्ठ कुठेतरी व्यस्त आहेत असे म्हणू नका, असे म्हणा की ते घटनापीठात आहेत किंवा दुसऱ्या पीठासमोर आहेत. ते योग्य वाटते.’