scorecardresearch

मोदी सरकारमध्ये सहभाग न मिळाल्याने शौरी दुःखी – भाजपचा पलटवार

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीदेखील शौरींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सहभाग न मिळाल्यामुळे अरूण शौरी यांना अतीव दुःख झाले असून, त्यामुळेच ते सरकारविरोधात टीकाटिप्पणी करीत असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी देण्यात आली.
मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकारचा कारभार पाहून लोकांना आता मनमोहन सिंग यांच्या सरकारचीच आठवण येऊ लागल्याची टीका अरूण शौरी यांनी सोमवारी नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात केली होती. त्याचवेळी आतापर्यंत इतके कमकुवत पंतप्रधान कार्यालय आपण कधी पाहिले नव्हते, असेही ते म्हणाले होते. त्यावर भाजपकडून अधिकृतपणे मंगळवारी प्रतिक्रिया देण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंग म्हणाले, अरूण शौरी यांना सरकारमध्ये सहभागी करून न घेतल्यामुळे त्यांना जे काही दुःख झाले आहे. तेच त्यांच्या सरकारवरील टीकेतून बाहेर पडले असल्याचे आम्हाला वाटते.
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीदेखील शौरींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शौरी सध्या कोणत्या गटात आहेत. हेच त्यांच्या सध्याच्या विधानांवरून दिसून येते आहे.
दिल्लीमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर शौरी यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर कोरडे ओढले. ते म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन म्हणजे केवळ माध्यमांमधील अर्थविषयक वृत्तांकनाच्या शीर्षकांचे व्यवस्थापन असे या सरकारला वाटते आहे. मात्र, त्यातून काहीही साध्य होणार नाही. जुन्या सरकारच्या आणि सध्याच्या सरकारच्या धोरणांमध्ये विशेष काहीच फरक नसल्याची जाणीव लोकांना होऊ लागली आहे. यूपीए सरकारची धोरणे आणि गोमांस यावरच सध्याच्या सरकारचे कामकाज सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-10-2015 at 13:40 IST

संबंधित बातम्या