Shubhanshu Shukla Axiom-4 mission Launch : भारतीय हवाई दलाचे वैमानिक शुभांशू शुक्ला हे मंगळवारी (१० जून) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र, ही मोहीम (AXIOM-4) आता पुढे ढकलण्यात आली आहे. खराब हवामानामुळे ही अवकाश मोहीम एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) त्यांच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरून याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला व त्यांचे इतर तीन साथीदार (क्रू मेंबर्स) AXIOM-4 या यानातून अवकाशात झेपावणार होते. मात्र, आता हे यान बुधवारी उड्डाण करेल.

AXIOM-4 मोहिमेंतर्गत १० जून रोजी सकाळी ८.२२ वाजता अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र नासाच्या केनेडी स्पेस सेंटरच्या एलसी-३९ए या लॉन्च पॅडवरून स्पेसड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून हे यान अवकाशात झेपावणार होतं. मात्र, आता हे यान ११ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता उड्डाण करेल.

इस्रोने काय म्हटलंय?

इस्रोच्या हॅण्डलवरून या संस्थेचे प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांचं निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की खराब हवामानामुळे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाण्यासाठीची AXIOM-4 ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. हे यान आता १० जून ऐवजी ११ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता अवकाशात झेपावेल”.

अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

शुभांशू शुक्ला हे बुधवारी, ११ जून रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटर इथून इतर तीन अंतराळवीरांसह मोहिमेला सुरुवात करणार आहेत. या उड्डाणानंतर शुभांशू शुक्ला मोठा इतिहास रचतील. कारण मानवाला अंतराळात नेणारी ही भारताची दुसरी अवकाश मोहीम आहे. याआधी १९८४ मध्ये भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनी रशियन अवकाशयानातून उड्डाण केलं होतं. शुंभाशू हे या AXIOM-4 मोहिमेंतर्गत त्यांच्या टीमबरोबर १४ दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहणार आहेत. यावेळी ते काही प्रयोग करणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नासा (NASA) व इस्रो (ISRO) या दोन दिग्गज अंतराळ संशोधन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात आहे. या दोन मोठ्या संस्थांनी केलेल्या संयुक्त कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अंतराळवीर पाठवण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. या मोहिमेअंतर्गतच शुभांशू शुक्ला अवकाश प्रवास करणार आहेत. त्यांची AXIOM-4 मोहिमेसाठी ‘प्राइम अस्ट्रॉनॉट’ (प्रमुख अंतराळवीर)म्हणून निवड करण्यात आली आहे.