श्रीनगर : जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ातील पंपोर भागात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उमर मुश्ताक खांडे याच्यासह दोन दहशतवादी ठार झाले. यावर्षीच्या सुरुवातीला दोन पोलिसांच्या हत्येच्या घटनेत खांडेचा सहभाग होता. दरम्यान, श्रीनगर व पुलवामा जिल्ह्य़ांत शनिवारी दहशतवाद्यांनी दोन परप्रांतीय नागरिकांची गोळ्या घालून हत्या केली.

बिहारच्या बांका भागातील रहिवासी असलेल्या अरविंद कुमार साह (३०) याला दहशतवाद्यांनी शनिवारी सायंकाळी ईदगाहमधील एका उद्यानाबाहेर गोळ्या घातल्या. यात तो जागीच मरण पावला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पुलवामा जिल्ह्य़ातील दुसऱ्या घटनेत, दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील सगीर अहमद या सुतारावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेला अहमद नंतर रुग्णालयात मरण पावला.

गेल्या आठवडय़ात श्रीनगरमध्ये अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींच्या हत्येत सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना २४ तासांच्या कालावधीत पकडण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला असतानाच या हत्या झाल्या आहेत.

भाजपने या हत्यांचा निषेध केला आहे. परराज्यातील दोन व्यक्तींच्या हत्या अत्यंत निषेधार्ह आणि धक्कादायक असल्याचे पक्षाचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर म्हणाले.  नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला व पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन यांनीही या हत्यांचा निषेध केला आहे.

पंपोर येथील कारवाई

मोहम्मद युसूफ आणि सुहैल अहमद हे दोन पोलीस कर्मचारी श्रीनगरमधील बागत भागात चहा पीत असताना दहशतवादी उमर खांडे याने जवळून गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. शनिवारी द्रंगबाग, पंपोर येथे सुरक्षा दलांनी त्याला ठार मारले. त्याचा अनेक दहशतवादी कृत्यांत सहभागी होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विटरवर लिहिले. पंपोरच्या चकमकीत आणखी एक अनोळखी दहशतवादी ठार झाला असून घटनास्थळावरून शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला.

काश्मीर पोलिसांनी यावर्षी ऑगस्टमध्ये जाहीर केलेल्या आणि सुरक्षा दलांचे लक्ष्य असलेल्या ‘टॉप १०’ दहशतवाद्यांच्या यादीत खांडे याचे नाव होते.

शोधमोहीम

 जम्मूहून आलेल्या वृत्तानुसार, जम्मू व काश्मीरच्या सीमावर्ती पूंछ व राजौरी या जिल्ह्यंमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. लष्कराच्या सात जवानांना ठार करणाऱ्या  दहशतवाद्यांचा शोध लागोपाठ सहाव्या दिवशीही सुरूच होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर व पोलिसांनी मेंढर भागात शोध मोहीम हाती घेतली असता, गोळीबाराचे आवाज ऐकू आले. तेथे गुरुवारपासून सुरक्षा कडे करण्यात आले होते.