RG Kar Rape And Murder Case : कोलकात्यातील आर जी कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील महिला डॉक्टरचा बलात्कार व हत्येप्रकरणी सियालदाह जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांनी मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवले आहे. आता संजय रॉयला सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. कोलकात्यात घडलेल्या या भयंकर घटनेमुळे अवघा देश हादराला होता. दरम्यान घटनेच्या सुमारे सहा महिन्यांनी मुख्य आरोपी संजय रॉय याला गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आल्यानंतर पीडितेच्या वडिलांना न्यायालयातच अश्रू अनावर झाले.

आज सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी सांगितले की, “आम्ही सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासले आहेत. तसेच वकिलांचा युक्तिवादही ऐकला. या सर्वांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहीजे.”

निकालाची सविस्तर माहिती देताना, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणाले, “ज्या पद्धतीने आरोपीने पीडितेची हत्या केली, त्यासाठी आरोपीला मृत्युदंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. बीएनएसच्या कलम ६४ अंतर्गत, किमान शिक्षा १० वर्षे आणि कलम ६६ अंतर्गत २५ वर्षे तुरुंगवास किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे. “

तुमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला…

सियालदाह जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश अनिर्बान दास यांनी या प्रकरणी निकाल दिला तेव्हा पीडितेच्या वडिलांनी त्यांना म्हटले की, “मी तुमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला तुम्ही योग्य न्याय दिला आहे.”

दरम्यान कोलकात्यातील आर जी कर रुग्णालयात ही घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या घटनेचा देशभरातून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला होता. कोलकाता पोलिसांचा स्वंयसेवक म्हणून काम करणाऱ्या संजय रॉयने गुन्हा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट २०२४ रोजी त्याला अटक करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे नेमकं प्रकरण?

कोलकात्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या ९ ऑगस्ट रोजी सकाळी एक महिला डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली होती. त्यावेळी तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावर अनेक जखमा होत्या. तेव्हा तिच्या डोळ्यांमधूनही रक्त वाहात होते. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. अत्यंत क्रूर पद्धतीने तिची हत्या करण्यात करण्यापूर्वी, तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.